महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । भाजपविरोधात देशात उभ्या राहिलेल्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची पुढील महत्त्वाची बैठक मुंबईत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. काँग्रेसच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावरही यावेळी शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले.
आज विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, नसीम खान यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार आदी उपस्थित होते. शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. त्या बैठकीच्या पूर्वतयारीबाबतही यावेळी पवारांनी मार्गदर्शन केले. मुंबईतील बैठकही महत्त्वाची ठरणार आहे. कारण त्या बैठकीला बिगरभाजपा राज्यांचे मुख्यमंत्री आणि शंभरहून अधिक महत्त्वाचे नेते येणार आहेत. मुंबईतील ‘इंडिया’ बैठकीचे आयोजक महाविकास आघाडी असणार आहे, असे पटोले यांनी यावेळी सांगितले. पुढील आठवडय़ात विधानसभेत काँग्रेसचा गटनेता दिसेल, असेही यावेळी पटोले यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील बैठकीदरम्यान शरद पवार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि त्यांनाही चर्चेबद्दल माहिती दिली, असे पटोले यांनी सांगितले.
15 ऑगस्टनंतर आघाडीच्या नेत्यांचे राज्यव्यापी दौरे
राज्यातील अतिवृष्टीमुळे थोडे थांबून 15 ऑगस्टनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांचे राज्यव्यापी दौरे सुरू होतील असेही पटोले यांनी सांगितले. या दौऱयांमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेत्यांचाही समावेश असणार आहे.