Moeen Ali Retirement : ‘कर्णधारने मला आता मेसेज केला तर…’ मोईन अलीने पुन्हा ठोकला कसोटी क्रिकेटला रामराम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑगस्ट । Moeen Ali Retirement : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने सोमवारी कसोटी क्रिकेटला निरोप दिला. अॅशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 49 धावांनी पराभव केला. यानंतर मोईन अली म्हणाला की, मी शेवटचा कसोटी सामना खेळला आहे. याआधी मोईन अलीने 2021 मध्ये कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता पण त्यानंतर 2023 च्या अॅशेसमध्ये पुनरागमन केले.

मोईन अली इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सच्या सांगण्यावरून परतला होता, पण आता स्टोक्सने त्याला पुन्हा मेसेज केल्यास तो परत येणार नाही असे त्याने सांगितले आहे. या सामन्यात इंग्लंडच्या दोन क्रिकेटपटूंनी निवृत्तीचा निर्णय घेतला. मोईन अलीपूर्वी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनेही निवृत्ती जाहीर केली होती.

मॅचनंतर स्काय स्पोर्ट्सशी बोलताना मोईन अली म्हणाला की, जर स्टोक्सने त्याला पुन्हा टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी मेसेज केला तर तो मेसेज डिलीट करेल. इंग्लंडच्या प्रमुख फिरकीपटूंपैकी एक जॅक लीच अॅशेसपूर्वी दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर स्टोक्सने मोईन अलीला मेसेज करून खेळण्यासाठी बोलले होते. मोईन अलीने विचार करून निर्णय बदलला होता आणि निवृत्तीवरून परतला होता.

मोईन अलीने या मालिकेत चार सामने खेळले, ज्यात तो नऊ विकेट घेण्यात यशस्वी ठरला. त्याने शेवटच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात तीन महत्त्वपूर्ण विकेट घेत इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, पॅट कमिन्स या तीन विकेट घेतल्या. पहिल्या डावात त्याने गोलंदाजी केली नाही. या मालिकेत मोईन अलीनेही नंबर-3 वर फलंदाजी केली. मोईन अलीने चार सामन्यांत एकूण 180 धावा केल्या, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.

मोईन अलीच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने 68 सामने खेळले ज्यात 28.12 च्या सरासरीने 3094 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 5 शतके आणि 15 अर्धशतके आली. कसोटीत 3000 हून अधिक धावा करणारा आणि 200 हून अधिक बळी घेणारा तो जगातील 16 वा क्रिकेटपटू आहे. मोईन मात्र एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *