लोक सोनं खरेदी टाळतायेत, नेमकं कारण काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑगस्ट । चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीअखेर (एप्रिल ते जून २०२३) देशभरात सोन्याच्या मागणीत ७ टक्के घसरण झालेली दिसून आली आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक देश आहे. चालू आर्थिक वर्षाच्या या पहिल्या तिमाहीत १५८.१० टन सोन्याची मागणी नोंदवली गेली आहे. ही माहिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने दिली आहे. चालू वर्षाच्या (२०२३) एप्रिल ते जून या दुसऱ्या तिमाहीअखेर सोन्याच्या आयातीत मात्र १६ टक्के वाढ होऊन या काळात २०९ टन सोने देशात मागवले गेले आहे. चालू वर्षाच्या जानेवारी ते जून या पहिल्या सहामाहीत देशात सोन्याची मागणी २७१ टन असेल असे गृहित धरण्यात आले होते. तसेच दोन्ही सहामाही मिळून संपूर्ण वर्षातील सोन्याची मागणी ६५० ते ७५० टन राहील, असा अंदाज वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने वर्तवला होता.

सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं
दुसऱ्या तिमाहीतील मागणीत ७ टक्के झालेली घट ही मुख्यतः सोन्याच्या चढ्या भावामुळे दिसून आली आहे. सोन्याचा भाव या काळात मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले, असे निरीक्षण वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे भारतातील सीईओ सोमसुंदरम पीआर यांनी मांडले आहे.

सोन्याच्या आयातीमध्ये १६ टक्के वाढ
या तिमाहीत १५८.१ टन सोन्याची मागणी नोंदविण्यात आली. याच तिमाहीत सोन्याच्या आयातीमध्ये १६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. एप्रिल ते जून दरम्यान ही आयात २०९ टनांवर गेली आहे. सोन्याच्या आयातीच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. सोनेखरेदीपासून चार हात लांब ‘डब्ल्यूजीसी’च्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशातील सोन्याची आयात २७१ टनांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षभरातील आयात ६५० ते ७५० टनांवर जाण्याची शक्यता आहे.

सोन्याच्या मागणीत घसरण
‘डब्ल्यूजीसी इंडिया’चे सीईओ सोमसुंदरम यांच्या मते चालू वर्षाच्या सुरुवातीपासूनच देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली. त्यामुळे सामान्य ग्राहक सोनेखरेदी टाळत आहेत. पहिल्या तिमाहीत सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ६४ हजार रुपयांपर्यंत गेले होते. त्यामुळे सोन्याच्या मागणीत घसरण झाली आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या करधोरणामुळेही सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे २००० रुपयांची नोट चलनाबाहेर गेल्याचाही परिणाम सोन्याच्या खरेदीवर झाला आहे.

सोनेखरेदीच्या मूल्यात वाढ चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या कालावधीत सोन्याच्या एकूण मागणीत सात टक्के घट नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १७०.७ टक्के सोन्याची मागणी नोंदविण्यात आली होती. यंदा मात्र, ती घटून १५८.१ टनांपर्यंत घसरली. मागणी कमी होऊनही सोनेखरेदीच्या एकूण मूल्यात मात्र वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत देशांतर्गत बाजारात ७९ हजार २७० कोटी रुपयांच्या दागिन्यांची विक्री झाली. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत ८२ हजार ५३० कोटी रुपयांच्या दागिन्यांची विक्री झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *