राज्य शासनाचा मोठा निर्णय ; पुणे, मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी संपणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.५ ऑगस्ट । पुणे-मुंबई अन् मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी आता सामान्य बाब झाली आहे. दर शनिवार, रविवारी होणाऱ्या वाहतूक कोंडीनंतर आता अपघातामुळे वाहतूक ठप्प होत आहे. यामुळे गेल्या दहा दिवसांत सहा वेळा हा मार्ग कासवगती मार्ग झाला होता. एक्स्प्रेस वे वर मोठा टोल भरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना नेहमी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येते. यामुळे राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.

काय आहे निर्णय
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे २००२मध्ये तयार करण्यात आला. ९४ किलोमीटरच्या या महामार्गामुळे पुणे आणि मुंबई दरम्यानचे अंतर कमी झाले. दोन्ही शहरांमधील प्रवास अधिक गतिमान झाला. परंतु २००२ नंतर आता २०२३ मध्ये या महामार्गावर वाहनांची संख्या मोठी वाढली आहे. या ‘द्रुतगती महामार्गा’वर आता क्षमतेपेक्षा अधिक वाहने धावत आहे. त्यामुळे अपघात होणे, वाहतूक कोंडी हे प्रकार होत आहे. यावर राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. या मार्गावर आणखी लेन करण्यात येणार आहे. आता राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) प्रस्ताव तयार केला गेला आहे. यामुळे या मार्गावर दोन लेन वाढणार असून वाहतूक कोंडी संपणार आहे.

काय होती क्षमता
मुंबई पुणेसाठी एक्स्प्रेस-वे उभारताना भविष्याचा विचार केला गेला होता. या मार्गावरुन रोज ४० हजार वाहने जातील, असा आराखडा तयार करुन महामार्ग तयार केला गेला. परंतु आता या महामार्गावरुन रोज ६० हजार वाहने जात आहेत. वीकेंडला म्हणजे शनिवार अन् रविवारी हा आकडा ८० ते ९० हजारांवर जातो. यामुळे एक्स्प्रेस-वेवर नेहमी वाहतूक कोंडी होते. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनामुळे महामार्ग ठप्प झाला होता. तसेच अपघातामुळे हा प्रश्न गंभीर होतो.

आता होणार आठ लेन
पुणे-मंबई एक्स्प्रेस-वेवर सध्या सहा लेन आहे. या ठिकाणी आठ लेन तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी जागा संपादित केलेली आहे. काही ठिकाणी जागा लागणार आहे. तसेच बोगदा, पूल अशी कामे करण्यात येईल. यासाठी साडेचार हजार कोटी रुपये खर्च होणार आहे.

जुन्या मार्गावर लेन वाढणार
पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गाप्रमाणे जुन्या मार्गावर दोन लेन वाढवण्यात येणार आहे. त्याबाबत प्रस्ताव केला गेला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. दोन्ही मार्गावर मिळून एकून चार लेन वाढणार आहे. यामुळे या ठिकाणी असणारी वाहतूक कोंडीचा विषय संपणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *