Rain : राज्यात पावसाची विश्रांती ? हवामान विभागाकडून महत्वाची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने अनेक भागांत विश्रांती घेतली आहे. यापूर्वी जुलै महिन्यात कोकण आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कमी होऊ लागला. गेल्या चार, पाच दिवसांपासून पावसाने राज्यातील अनेक भागांत दडी मारली आहे. सोमवारी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यास हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला नाही. परंतु विदर्भातील काही भागात यलो अलर्ट दिला आहे. आगामी चार दिवस राज्यात पाऊस कसा असणार आहे, याचा अंदाजही हवामान विभागाने जारी केलाय.

कसा असणार पाऊस
पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत १० ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज दिला आहे. राज्यात १० ऑगस्टपर्यंत कुठलेही तीव्र हवामानाचे इशारे दिले नाहीत. तसेच येत्या 4, 5 दिवस हलका ते मध्यम पाऊस असणार आहे. दरम्यान सोमवारी वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांत यलो अलर्ट दिला आहे. इतर कोणत्याही जिल्ह्यात पावसाचा अलर्ट दिला गेला नाही.

मुंबई, पुणे धरणसाठा
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच धरणांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा झाला आहे. परंतु पाणी कपात कायम राहणार आहे. पावासाने ओढ दिल्यास भविष्यात टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून ही काळजी घेतली जात आहे. बदलापूरचे बारवी धरण ऑगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणाच्या ८ दरवाजांमधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

भीमा नदी पात्रात विसर्ग
पुणे शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीपुरवठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांचे पाणी कपातीचे संकट टळणार आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील चास कमान धरण पूर्ण भरले आहे. या धरणाच्या दोन दरवाजेद्वारे 1096 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. डाव्या कालव्यातून 500 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे शिरूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी सुटला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळसुबाई – हरिश्चंद्रगड परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. या ठिकाणी निळवंडे धरण 82 टक्के भरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *