घराखाली सापडली २०० वर्षे जुनी गुहा ; आतील दृश्य पाहून आश्चर्याचा धक्का

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । लंडन: एका तरुणीला तिच्या घराखाली गुहा सापडली आहे. तिनं याची माहिती तिच्या मित्र परिवाराला आणि शिक्षकांना दिली. त्यानंतर सगळेच गुहा पाहण्यास गेले. ही गुहा कित्येक दशकं जुनी मानली जात आहे. घटना ब्रिटनच्या नॉटिंघमची आहे. ही गुहा १८ व्या शतकातील असावी असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. याचा वापर त्याकाळी तळघर म्हणून करण्यात येत असावा, अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली.

द सननं दिलेल्या वृत्तानुसार, तरुणीच्या घरात २०० वर्ष जुनी गुहा लाईटचं काम सुरू असताना सापडली. मजूर इमर्जन्सी लाईट लावत असताना त्यांना घराच्या खाली गुहा असल्याचं आढळून आलं. गुहा सापडताच सर्वच विद्यार्थी आत शिरले. तिथे त्यांना एक संपूर्ण मजलाच असल्याचं लक्षात आलं. चार भिंती कापून तिथे एक बाक तयार करण्यात आला होता. त्याचा वापर भोजनासाठी किंवा खाद्य पदार्थ साठवण्यासाठी केला जात असावा असा अंदाज आहे.

नॉटिंघम ट्रेंट विद्यापीठात ब्रॉडकास्ट जर्नलिझमचा अभ्यास करणाऱ्या स्टेफनी बेनेट नावाची तरुणी घरात राहायला आली त्यावेळी तिला घराच्या खाली असलेल्या गुहेची कल्पना नव्हती. घराखाली गुहा असल्याचं लक्षात येताच सुरुवातीला ती काहीशी घाबरली होती. ‘घराच्या खाली सापडलेली गुहा फारशी मोठी नाही. ती ६ फूट लांब आणि ४ फूट रुंद आहे. या गुहेचा शोध लागल्यावर मी सुरुवातीला घाबरले. तिथे काय सापडेल याची भीती वाटत होती. आम्ही गुहा कायम उघडी ठेवू. कारण घरात गुहा असणं शुभ मानलं जातं,’ असं बेनेटनं सांगितलं. या गुहेचा वापर कसा करायचा ते अद्याप ठरलेलं नाही. आम्ही तर अद्याप तिथे पार्टीही केलेली नाही, असं ती गंमतीत म्हणाली.

बेनेट, तिचा मित्र परिवार आणि शिक्षकांनी गुहेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी पुरातत्त्वतज्ज्ञांशी संपर्क साधला. ‘ही गुहा एखाद्या तळघरासारखी वाटते. ती १९ व्या शतकातील असू शकते. गुंफा आकारानं लहान आहे,’ अशी माहिती नॉटिंघम सिटी काऊन्सिलचे कार्यवाहक पुरातत्त्वतज्ज्ञ स्कॉट लोमॅक्स यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *