महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । जुलैचा शेवट झाला आणि पावसानंही मोठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. ऑगस्टची सुरुवातच कोरडी झाली. दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला मात्र राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची हजेरी पाहायला मिळाली. असं असतानाच पुढील चार दिवसांसाठी पावसाची विश्रांतीच असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला खरा. पण, आता मात्र पाऊस या अंदाजालाही मोडीत काढणार आहे. कारण, राज्याच्या काही भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी X (ट्विटर) या माध्यमातून माहिती देत महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्याच मध्यम तर, राजच्या इतर भागांमध्ये हलक्या स्वरुपातील पावसाची हजेरी असेल असं सांगितलं आहे. मुंबईसह पश्चिम उपनगर आणि नवी मुंबईतही पावसाच्या सरी बरसतील तर, मध्येच सूर्यकिरणांनी शहर झळाळून निघेल. काही भागांमवर मात्र पावसाळी ढगांची चादर कायम असेल.
पावसाचा प्रवास नेमका कोणत्या दिशेनं?
मान्सूनचे वारे सध्या उत्तरेकडे सरकत असल्यामुळं राज्यातील पावसाचं प्रमाण काही अंशी कमी झालं आहे. तर, काही भागांमध्ये मात्र हा पाऊस धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. उत्तर बांगलादेश आणि नजीकच्या परिसरातून सध्या 900 मीटर उंचीवरून चक्राकार वारे वाहत आहेत. परिणामी मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा अपेक्षित स्थितीहून उत्तरेकडे सरकताना दिसत आहे. सध्याच्या घडीला हे वारे अमृतसरपासून मणिपूरपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळं हा पट्टा हिमालयापाशी राहण्याची चिन्हं आहेत. इथं किनारपट्टी भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय नसल्यामुळं पावसाची शक्यता कमी आहे.