महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ४ धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून शहराला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये आतापर्यंत २६.०७ टीएमसी म्हणजे ८९.४४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाल्याने चारही धरणातील पाण्याची आवक मंदावली आहे.
परिणामी पाणीसाठ्यात होणारी वाढ कमी झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणात २५ जुलै रोजी जास्त पाऊस झाला. त्या दिवशी म्हणजे २४ तासात १२७८ दशलक्ष घनफूट येवा (आवक) होता. त्यानंतर, काही दिवस तो ९००, ८०० दशलक्ष घनफूट पर्यत होता.
जुलैच्या शेवटच्या शेवटच्या २४ तासातील येवा ७५१ दशलक्ष घनफूट होता. शनिवारी ३८७, रविवारी ३०९, सोमवारी १९१ दशलक्ष घनफूट येवा होता. अशा प्रकारे येवा कमी होत गेला आहे. परिणामी पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होणे कमी झाले आहे.
पानशेत धरणातून रविवारीपासून संध्याकाळी सुमारे ६०० क्युसेकने पाणी सांडव्याद्वारे अंबी नदीत सोडले आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर धरण क्षेत्रातील पावसाचे प्रमाण कमी झाला आहे. मंगळवारी दिवसभरात खडकवासला येथे दोन, पानशेत- दोन, वरसगाव- दोन, टेमघर येथे चार मिलिमीटर पाऊस पडला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा
खडकवासला- ९२.६१ टक्के पाणीसाठा
पानशेत- ९७.२० टक्के पाणीसाठा
वरसगाव- ८८.३३ टक्के पाणीसाठा
टेमघर- ६९.३२ टक्के पाणीसाठा
आजचा एकूण उपयुक्त पाणीसाठा २६.०७ टीएमसी म्हणजे ८९.४४ टक्के