महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात आलेला उड्डाणपूल हा चांदणी चौकात नाही, तर एनडीए गेट चौकात आहे, यावर शनिवारी शिक्कामोर्तब झाले. केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एनडीए गेट चौक राष्ट्राला समर्पित करण्यात आला. दरम्यान, या चौकात रणगाडा, आयएनएस विक्रांत आणि मिग लढाऊ विमानांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत.

शहराच्या पश्चिम प्रवेशद्वारावरील बाह्यवळण रस्त्यावर वाहतूक कोंडी सातत्याने होत होती. त्यामुळे या चौकात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपूल उभारण्यात आला. सुमारे एक हजार कोटींचा हा उड्डाणपूल शनिवारपासून (दि. 12) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, हा उड्डाणपूल चांदणी चौकात आहे की एनडीए गेट चौकात, यावरून चर्चा सुरू होती.
दरम्यान, लोकार्पण सोहळ्यासाठी भाजपच्या निमंत्रणपत्रिकेतही ’चांदणी चौक उड्डाणपूल’ असे नमूद करण्यात आले होते. मात्र, हा उड्डाणपूल चांदणी चौकात नाही, तर एनडीए गेट चौकात आहे, असा दावा सुरू होता. समाजमाध्यमांतू ही त्यावर सातत्याने चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर हा चौक राष्ट्राला समर्पित करण्यात आल्याने तो एनडीए गेट चौक असल्याचे स्पष्ट झाले आहे.