महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात उत्साह असतानाच पुण्यात एका कार्यक्रमात गायिका व नर्तक असलेल्या तरुणीने उन्मादात तिरंग्याचा अपमान केल्याचे समोर आले आहे. या गायिकेने स्टेजवर नाचता नाचता तिरंगा ध्वज दोन्ही हातांनी फिरवला व नंतर तो प्रेक्षकांमध्ये फेकून दिला. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. पुणे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तातडीने गायिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गायिका उमा शांती उर्फ शांती पिपल हिच्या विरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आगे. पुण्यातील हॉटेल फ्रेक सुपर क्लबमध्ये हा प्रकार घडला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्टोरजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात या गायिकेने दोन हातात दोन ध्वज घेतले. गाणे म्हणत ते ध्वज ती दोन्ही हाताने फिरवत होती. शेवटी तिने ते दोन्ही ध्वज प्रेक्षकांमध्ये फेकून दिले. मुंडवा परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये उमा शांती म्युझिक बँडसोबत परफॉर्म करत होती. तेव्हा हा प्रकार घडला.
घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. अनेक युझर्सनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत गायिका व कार्यक्रमाच्या आयोजकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ‘आमचा तिरंगा ही आमची ओळख आहे. संघर्ष करून मिळवलेल्या स्वातंत्र्याचे ते प्रतीक आहे. असंख्य सैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने आमचा तिरंगा उंच फडकत आहे. पुण्यातील हे कृत्य योग्य नाही’, असे युझर्सनी म्हटले आहे.
व्हिडिओ व्हायरल होताच गायिका उमा शांती उर्फ शांती पिपल विरोधात गुन्हा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तिरंग्याचा अवमान यासोबतच हातवारे करून असभ्य वर्तन केल्याची तक्रारही तिच्याविरोधात दाखल झाली आहे. राष्ट्रध्वजाच्या आचारसंहितेचा भंग करून अवमान केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी उमा शांती गायिकेसह कार्यक्रमाच्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झालेल्या कार्यक्रमाविषयी खुलासा करावा, अशी नोटीसही दोघांना पुणे पोलिसांनी बजावलील आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. त्यामुळे गायिकेसह कार्यक्रमाच्या आयोजकांना आता चांगल्याच अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.