महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । इंग्लंडचा कसोटी कर्णधार व आघाडीचा अव्वल अष्टपैलू बेन स्टोक्स आपला निवृत्तीचा निर्णय फिरवत भारतातील आगामी वन-डे विश्वचषक स्पर्धेत सहभागी होऊ शकतो, असे सनसनाटी वृत्त ‘द टेलिग्राफ’ या ब्रिटिश दैनिकाने दिले आहे. बेन स्टोक्स खळबळजनक यू टर्न घेण्यासाठी जवळपास राजी झाला आहे आणि इंग्लंडला वन-डे विश्वचषक जेतेपद कायम राखून देण्यासाठी तो पुनरागमन करू शकतो. अगदी यासाठी आयपीएल स्पर्धा चुकवावी लागली तरी याचीही तयारी त्याने केली आहे, असे या दैनिकाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील इंग्लिश कर्णधार जोस बटलरकडून विचारणा झाल्यास बेन स्टोक्स यंदाचा विश्वचषक निश्चितपणाने खेळेल. वास्तविक, स्टोक्सला आयपीएलमध्ये दरवर्षी 16 कोटी रुपयांचे पॅकेज लाभते; पण राष्ट्रहित समोर ठेवून तो आयपीएलमधूनही माघार घेणे अपेक्षित असल्याचे संकेत आहेत. इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध 25 जानेवारी ते 11 मार्च या कालावधीत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. याशिवाय, स्टोक्सने मे अखेरपर्यंत आयपीएलदेखील खेळली तर एकूण 5 महिने त्याला भारतात राहावे लागेल. इतका वेळ देणे कठीण असल्याने तो आयपीएलमधून माघार घेऊ शकतो, असे चित्र आहे. यादरम्यान, स्टोक्सला गुडघ्याची शस्त्रक्रिया करवून घेणे भाग असून, त्यातून सावरत शक्य तितक्या लवकर तंदुरुस्त राहणे हा त्याचा प्राधान्यक्रम असावा लागणार आहे.
इंग्लंडची वन-डे विश्वचषक स्पर्धेतील मोहीम 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादेतील न्यूझीलंडविरुद्ध लढतीने सुरू होईल. स्टोक्सने वन-डे क्रिकेटमधून निवृत्त होण्यापूर्वी 105 वन-डे लढती खेळल्या आहेत. गतवर्षी त्याने निवृत्ती जाहीर केली; पण आता संघाची गरज पाहता तो पुन्हा एकदा विश्वचषकासाठी रणांगणात उतरू शकतो, अशी दाट शक्यता आहे.