मनधरणीचे प्रयत्न निष्फळ? अजितदादांचे आता उत्तरसभांमधून पवारांना प्रतिआव्हान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । संपूर्ण राष्ट्रवादीच भाजपसोबत सत्तेत यावी आणि पक्षफूट टाळावी, अशी आग्रहपूर्वक मागणी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व बंडखोर नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची अनेक वेळा मनधरणी केली. केंद्रात सुप्रिया सुळेंना मंत्रिपदाचे आमिषही दाखवले. पण शरद पवार भाजपविरोधी भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे आता अजितदादा गटाने शरद पवारांना उत्तरसभांमधून आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी २७ ऑगस्टपासून अजितदादा गटाचे नेते ‘महाराष्ट्र परिक्रमा’ काढणार आहेत. याद्वारे ते राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत जाण्याची आपली भूमिका कशी रास्त आहे, हे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करतील. तसेच आजवर आपल्यावर कसा अन्याय झाला, याचा पाढाही वाचतील. दरम्यान, बंडखोरांच्या मतदारसंघात शरद पवार सभा घेत आहेत. पहिली सभा त्यांनी भुजबळांच्या येवल्यात घेतली. आता धनंजय मुंडेंचा जिल्हा असलेल्या बीडमध्ये १७ ऑगस्टला त्यांची सभा होईल. अजितदादा गटाच्या ‘परिक्रमे’ची पहिली सभा याच जिल्ह्यात होईल.

मविआबाबत : काँग्रेस व ठाकरे गट वेगळा प्लॅन करत असल्याच्या चर्चा चुकीच्या आहेत. या आघाडीत कुणाचेही मतभेद नाहीत. माझी भाजपविरोधी भूमिका पूर्वी जशी होती तशीच आता कायम आहे.

अजितदादांबाबत : आमची भेट गोपनीय नव्हतीच. राजकीय चर्चाही तिथे झाली नाही. ते ज्या पक्षात होते त्यांचा ‘वरिष्ठ’ मीच आहे. मग माझ्याशी चर्चेस कोण येईल? त्याला कुणीही महत्त्व देण्याची गरज नाही.

इंडियाबाबत : ‘इंडिया’ आघाडी २०२४ चे चित्र बदलण्यासाठी कष्ट घेईल. या आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. यात भाजपविरोधी रणनीती बनवली जाईल. बिहार, कर्नाटकमध्ये दोन सभा घेऊन आम्ही देशभरात मोदींविरोधात जनमत तयार करू.

मोदींबाबत : ‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या मोदींनी फडणवीसांचे मार्गदर्शन घेतले असेल. फडणवीस पुन्हा आले ते खालच्या पदावर. मोदीही कसे येतील ते सांगता येत नाही, असे शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *