महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । गेल्या वर्षी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून जवळपास वर्षभरच महाराष्ट्रातील राजकारणाने वेगवेगळी वळणे घेतली. राज्यातील राजकीय परिस्थिती युद्धस्वरूपातील असल्याने राजकारण्यांच्या ताेंडून गद्दार, कलंक, औरंगजेब, खेकडे, ईडी, खंजीर, खाेके, निष्ठावान यासारखे शब्द जनतेच्या कानावर वारंवार आदळत राहिले. महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या या शब्दांचा नेमका अर्थ लावण्यासाठी देशभरात नेटकऱ्यांनी गुगल सच केले जात आहे. या सर्चमध्ये वर्षभरात सर्वाधिक वेळा शोध घेतलेल्या शब्दांमध्ये ‘औरंगजेब’ तर गद्दार हे शब्द ‘वर्ड आफ दि इयर’ ठरावे एवढचा विक्रमी वेळा सर्व करण्यात आले आहेत.
राज्याच्या राजकारणात सततच्या अस्थिरतेमुळे राजकीय घडामोडी गतिमान आहेत. गेल्या वर्षी जून-जुलै महिन्यात शिवसेना पक्ष फुटल्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले, यामुळे पक्षाशी असलेली निष्ठा, फुटिरांनी केलेली गद्दारी, जवळच्या लोकांनी पाठीत खुपसलेला खंजीर या सारख्या चर्चा आणि शब्द सतत लोकांच्या कानावर येत होते. महाराष्ट्रातील राजकीय बंडाच्या घडामोडी साक्षीदार म्हणून गुजरातमधील सुरत, आसाममधील गुवाहाटी, गोव्यातील पणजी या शहर, राज्यांचा समावेश होता. साहजिकच यानिमित्ताने होणान्या घडामोडी, शब्दांचा शोध देशातील १९ राज्यातील लोक घेत होते. नेत्यांकडून वापरण्यात येणाऱ्या शब्दांचा अर्थ लावण्यासाठी नेटकऱ्यांकडून गुगल सर्च केले होते, अजूनही सुरूच आहे.
भाजप-शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षात वारंवार औरंगजेबाचा उल्लेख झाला. औरंगाबाद शहराच्या नामांतरणाचा विषय सतत पाच वर्षे चर्चेत हाेता. प्रत्यक्षात नामांतर झाल्यानंतर औरंगजेब नेमका काेण, त्याच्याविषयी आणखी काही माहिती मिळते का हे शाेधण्याचा प्रयत्न नेटकरी करीत हाेते. सर्वाधिक सर्च झालेल्या राजकीय शब्दकाेशातील पाच शब्दांपैकी सर्वाधिक ४४ टक्के औरंगजेब, २६ टक्के गद्दार, १३ टक्के कलंक, १२ टक्के ईडी आणि ५ टक्के लोकांनी खेकडा या विषयी सर्च केले आहे. हे सर्व शब्द वर्षभरात राजकीय वर्तुळात वापरले गेले आहेत.
राजकीय भाषणांत वापरण्यात आलेले चर्चेतील बहुतांश शब्द हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वापरले आहेत. महाराष्ट्रात वर्षभरात गद्दारी शब्दाचे पीक जाेमात हाेते. त्यामुळे १९ राज्यांत याचा शाेध घेतला. त्यात वरील ५ शब्दांत गद्दार शब्द आंध्रात १००%, मध्य प्रदेशात ३८%, गुजरातेत ४५%, आसाम ८८%, ओडिशा ७४%, तेलंगणात ३२% नेटकऱ्यांनी टाॅप सर्च केले. उत्तरेत औरंगजेब सर्च करण्यात आले.