महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाचे प्रमुख शरद पवार बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेत आहेत. शरद पवारांनी पहिली सभा छगन भुजबळांच्या येवल्यात घेतली. आता धनंजय मुंडेंचा जिल्हा असलेल्या बीडमध्ये शरद पवारांची आज जाहीर सभा होत आहे. पहिल्या सभेत छगन भुजबळांचा उल्लेख न करताही शरद पवारांनी त्यांच्याविरोधात चांगलीच वातावरण निर्मिती केली होती. आता आजच्या सभेत शरद पवार धनंजय मुंडेंचा कसा समाचार घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, संपूर्ण राष्ट्रवादीच भाजपसोबत सत्तेत यावी आणि पक्षफूट टाळावी, अशी आग्रहपूर्वक मागणी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व बंडखोर नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची अनेक वेळा मनधरणी केली. केंद्रात सुप्रिया सुळेंना मंत्रिपदाचे आमिषही दाखवले. पण शरद पवार भाजपविरोधी भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे आता अजितदादा गटाने शरद पवारांना उत्तरसभांमधून आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाची पहिली उत्तर सभा बीड जिल्ह्यातच होणार आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार गटाचा पहिला सामना बीडमध्ये रंगणार आहे. शरद पवारांच्या आजच्या सभेनंतर 10 दिवसांनी म्हणजे 27 ऑगस्ट ला अजित पवार प्रत्युत्तर देणार आहे.
