महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, असं म्हटल्यानंतर हे सगळेजण टुणकन भाजपाबरोबर गेले, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरेंच्या टीकेला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरे यांचं बऱ्यापैकी आयुष्य मिमिक्री करण्यात घालवलं आहे. त्यांनी मिमिक्री करण्यापेक्षा आपलं पक्षसंघटन कसं मजबूत करता येईल? यावर अधिक लक्ष केंद्रीत करावं, असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
राज ठाकरे यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेबाबत विचारलं असता सुनील तटकरे म्हणाले, “राज ठाकरे यांनी आपलं बऱ्यापैकी आयुष्य मिमिक्री करण्यात घालवलं आहे. कुठल्याही पक्षाच्या मागे लोकांची किती ताकद उभी राहते, यावरून राजकारणातलं यश मोजलं जातं. अजित पवारांनी गेल्या ३५ वर्षांत निवडणुका लढवत, पक्ष संघटना मजबूत करत, उत्तम पद्धतीचं प्रशासन दिलं आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकसंग्रह वाढवला आहे. त्यामुळे मला वाटतं की, राज ठाकरेंनी मिमिक्री करण्यापेक्षा आपल्या पक्षाचं संघटन कसं मजबूत करता येईल? यावर अधिक लक्ष केंद्रीत करावं.”