महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । भाजप एकनाथ खडसे व पंकजा मुंडेंसारखे अजित पवार यांनाही संपवेल, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी एका मराठी ऑनलाइन संकेतस्थळाशी बोलताना केला आहे. भाजपचा प्रादेशिक पक्षांना व लोकनेत्यांना संपवण्याचा इतिहास आहे. त्यांनी आतापर्यंत अनेकांना संपवले आहे. ते आता भाजप नेत्या पंकजा मुंडे व एकनाथ खडसे यांच्यासारखेच अजित पवार यांनाही संपवतील, असे ते म्हणालेत.
भाजपचा नेत्यांना संपवण्याचा इतिहास
रोहित पवार यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत उपरोक्त दावा केला. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. एखादा नेता भाजपसोबत जातो, तेव्हा भाजपच्या इतिहासानुसार त्याला संपवले जाते. भाजप स्वतःच्या लोकनेत्यांनाही असेच संपवतो. पंकजा ताई, पूर्वी मुंडे साहेब, एकनाथ खडसे यांनाही त्यांनीच संपवले. आमच्या पक्षातील लोकनेते अजित पवार भाजपसोबत गेले आहेत. त्यामुळे भाजप त्यांनाही संपवले जाईल अशी भीती वाटते, असे ते म्हणाले.
महाविकास आगाडीत आम्हाला थोडीफार शंका आली, की आम्ही खुल्या पद्धतीने त्यावर चर्चा करतो. हे आमच्या आघाडीचे वैशिष्ट्य आहे. आम्ही भाजपसारखे एखाद्या पक्षाला जवळ करून संपवत नाही. चर्चा न करता मागच्या बाजूने पक्ष संपवणे ही महाविकास आघाडीची नाही, तर भाजपची प्रवृत्ती आहे, असे रोहित पवार नाही.
भाजपने जाणिवपूर्वक पक्ष फोडले
भाजपने जाणिवपूर्वक शिवसेना – राष्ट्रवादी फोडली. ही भाजपची रणनीती आहे. एक पक्ष 2 गटांत फोडायचा. त्यानंतर त्यांच्यांत आरोप-प्रत्यारोप सुरु करायचे आणि स्वत: सेफ राहायचे अशी भाजपची रणनीती आहे, असे रोहित पवार म्हणाले.
महाराष्ट्राच्या अस्मितेला नख लावण्याचा प्रकार
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना 60 वर्षांचा प्रदिर्घ अनुभव आहे. भाजपचा विचार संपतो, तेथून पवारांचा विचार सुरू होतो. आपल्याला भाजपचे उद्दीष्ट साध्य होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे शरद पवारांनी भाजपची वृत्ती जनतेला सांगणे, ते महाराष्ट्राच्या अस्मितेला कसे नख लावत आहेत हे पटवून देणे ही रणनीती आखली आहे, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.