पिंपरी-चिंचवडमधील ‘वायसीएम’ रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण

Spread the love

मनुष्यबळाचीही कमतरता, रुग्णवाहिका 15 अन चालक फक्त दोनच…

वायसीएम रुग्णालयाची विदारक परिस्थिती, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांचे आयुक्तांना निवेदन

पिंपरी-चिंचवड ः

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्णवाहिका चालक उपलब्ध होत नाहीत. फक्त दोन रुग्णवाहिका चालक पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन अंतर्गत यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुजू असून, आपत्कालीन परिस्थितीत यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्णवाहिका चालक नाही ही दयनीय अवस्था यशवंतराव चव्हाण रुग्णालयाची झाली असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने पंधरा रुग्णवाहिका यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या सेवेत सध्या असून, काही रुग्णवाहिका गाड्यांची अवस्था दयनीय झाली आहे. तर काही रुग्णवाहिका नादुरुस्त अवस्थेत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत फक्त दोन रुग्णवाहिका चालक पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुजू असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी ताबडतोब दखल घेऊन दिवस रात्री दहा रुग्णवाहिका चालक तैनात करण्यात यावेत. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

क्षमतेपेक्षा जास्त रुग्णसंख्या, कर्मचाऱ्यांचा तुटवडा…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) पुणे जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येत असल्याने क्षमतेपेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत परिचारिकांची संख्या कमी आहे. संत तुकारामनगर येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ७५० खाटांचे ‘वायसीएम’ रुग्णालय आहे. या ठिकाणी औद्योगिकनगरीसह आजुबाजूच्या ग्रामीण भागातून तसेच राज्याच्या इतर भागातूनही हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. यात अस्थिरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, दंतरोग, कर्करोग असे विविध विभाग आहेत. यात आठ प्रकारच्या विशेष सेवा उपलब्ध आहेत. त्यामध्ये कॉर्डीओलॉजी, युरोलॉजी, न्युरोसर्जरी, न्युरोलॉजी, पेडियाट्रीक सर्जरी, हॅण्ड आणि प्लास्टीक सर्जरी, मुत्रपिंडे, मज्जासंस्था अशा प्रकारच्या सुविधांचा समावेश आहे. दररोज सुमारे दोन हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतात.

सध्या रुग्णालयामध्ये डॉक्टर, परिचारिका, आया, वॉर्ड बॉय असे एक हजार ७०० मनुष्यबळ आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे. परिचारिकांची संख्या अवघी १४० आहे. अनेकदा शस्त्रक्रिया करण्यासाठी वैद्यकीय साहित्य देखील रुग्णालयात उपलब्ध नसते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून साहित्य खरेदी करावे लागत आहे. ‘डॉक्टरांची कमतरता नाही मात्र रुग्णसंख्येच्या तुलनेत परिचारिकांची संख्या खूपच कमी आहे. जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येत असल्याने क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल होतात’, असे वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *