महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – सोलापूर – जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील बार्शी येथील पानगावचे सुपूत्र जवान सुनील काळे यांना वीरमरण आले. पुलवामातील बंदजू गावात पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीत सीआरपीएफ सुनील काळे शहीद झाले. हे वृत्त गावात समजताच गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई , भाऊ असा परिवार आहे.
पुलवामामधील बांदजू भागात आज, मंगळवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. तर यावेळी एक सीआरपीएफ जवान शहीद झाले. पोलिस आणि सुरक्षा दलांनी मिळून ही कारवाई केली आहे. दहशतवाद्यांकडून २ एके ४७ हस्तगत करण्यात आल्या आहेत. बांदजू भागात पोलिस, सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरु केले होते. या दरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये आज सकाळी चकमक सुरु झाली. यात दोन दहशतवाद्यांना मारण्यात आले. तर एक सीआरपीएफ जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. मात्र, त्यांना वीरमरण आले.