महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा लॅपटॉप आणि इतर उपकरणांच्या सततच्या वापरामुळे अनेकांना खांदेदुखी, मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास सुरू होतो. अशा स्थितीत आपली मान, बोट, मनगट आणि कोपर यांवरही विपरीत परिणाम होत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. मात्र, अशी स्थिती प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. कारण मोबाईल किंवा इतर उपकरणांच्या अतिवापरामुळे तुम्ही हळूहळू टेक्स नेक सिंड्रोमचे बळी ठरत आहात. यावेळी तुम्ही काही योगासने करून आराम मिळवू शकता. पण, त्याआधी टेक्स नेक सिंड्रोम म्हणजे काय ते जाणून घेऊ..
साधारणपणे आपल्या डोक्याचे वजन सुमारे ४.५ किलो असते. जेव्हा आपण डोकं सरळ ठेवतो तेव्हा त्याचा भार समान रीतीने मानेवर पडत असतो. पण, मोबाईलचा वापर करताना आपण पुढे वाकतो, अशावेळी मानेच्या स्नायूंवर डोक्याचा अधिक भार पडतो. यावर काही संशोधकांचे म्हणणे आहे की, ज्या ठिकाणी मानेचे स्नायू कवटीला जोडतात त्या ठिकाणी एक प्रकारचा प्रोट्र्यूशन दिसू शकतो आणि जाणवू शकतो. हे कधीकधी वेदनादायकदेखील असते. डॉक्टर या वेदनांना टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणतात. या आजारावर योगाभ्यासक कामिनी बोबडे यांनी काही योगाप्रकार सांगितले आहेत.
मोबाईलच्या अतिवापरामुळे तुमच्या खांद्यापासून डोक्यापर्यंतचे अनेक स्नायू दुखावतात. अशावेळी तुम्हाला टेक्स नेक सिंड्रोम आहे की नाही तपासण्यासाठी तुम्ही आरशासमोर मान समोर ठेवून उभे रहा आणि तुमचे कान तुमच्या खांद्याशी जुळत आहेत का ते पाहा. जर तुमचे कान थोडे पुढे असतील आणि ते खांद्याशी जुळत नसतील तर तुम्हाला टेक्स्ट नेक सिंड्रोमचा धोका असल्याचे समजून जा.
टेक्स्ट नेक सिंड्रोमपासून तुमचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी काही सोप्पी योगासने आहेत. जे फक्त सकाळीच नाही तर तुम्ही काम सुरू असतानाही करू शकता. विशेष म्हणजे खुर्चीत बसूनही तुम्ही हे योगा प्रकार करू शकता. अवघ्या पाच मिनिट योगा तुम्हाला टेक्स्ट नेक सिंड्रोमपासून सुरक्षित करतात.
