दिलीप वळसे-पाटील : उत्तुंग नेते असूनही महाराष्ट्राने एकदाही बहुमत देऊन शरद पवारांना मुख्यमंत्री केले नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑगस्ट । अजित पवार गटासोबत सत्तेत सहभागी झालेले दिलीप वळसे-पाटील यांनी प्रथमच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असे आपण म्हणतो परंतु महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना एकदाही बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही, अशी घणाघाती टीका दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे.

अजित पवार गटासोबत गेल्यानंतरही दिलीप वळसे-पाटलांनी आतापर्यंत शरद पवारांवर टीका केली नव्हती. शरद पवार हेच आमचे नेत व गुरू असल्याचे ते सांगत होते. मात्र, अचानक दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवारांवर एवढ्या प्रखर शब्दांत टीका केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच, आतापर्यंत शरद पवारांविषयी अत्यंत आदाराने बोलणारे दिलीप वळसे-पाटील का बोलले? याचीही चर्चा आता रंगू लागली आहे.

ममता, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री

रविवारी पुण्यातील मंचर येथील जाहीर कार्यक्रमात दिलीप वळसे-पाटील म्हणाले, शरद पवार यांना एकदाही स्वबळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आले नाही. देशातील अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष पाहिले तर ते पुढे जात आहेत. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. आपल्याकडे शरद पवारांसारखे नेते आहेत. मात्र, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपले (राष्ट्रवादीचे) फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते.

ईडीची नोटीस सापडली तर राजीनामा देईल

ईडीच्या भीतीपोटीच राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत गेले, या टीकेलाही दिलीप वळसे-पाटलांनी प्रत्युत्तर दिले. दिलीप वळसे-पाटील म्हणाले, कोणाला माझ्याविरोधात ईडीची नोटीस सापडली तर आमदारकीचा लगेच राजीनामा देईल. राज्य सरकारमध्ये मी, अजित पवार व काही सहकारी सहभागी झालो. याचा अर्थ भारतीय जनता पक्षात गेलो असे अजिबात नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरच आहोत. ईडी, सीबीआय इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यामुळे राज्य सरकारमध्ये सहभागी झाले असा अपप्रचार केला जात आहे. ते चुकीचे आहे. तशी नोटीस कोणाला सापडली तर घेऊन या. आमदारकीचा लगेच राजीनामा देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *