महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑगस्ट । राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. ‘शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत असं आपण म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा देशात एकही नेता नसल्याचं आपण म्हणतो. पण त्यांना राज्यात कधीच एकहाती सत्ता आणता आली नाही’, अशी खोचक टीका दिलीप वळसे पाटील यांनी केली होती.
दिलीप वळसे पाटील यांच्या या टीकेवर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर इतरही नेत्यांनी त्यांच्यावर टीका केला आहे. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
‘मी खंत व्यक्त करत होतो. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला’, असं स्पष्टीकरण दिलीप वळसे पाटील यांनी दिलं आहे. वळसे पाटील यांनी केलेल्या टीकेनंतर कार्यकर्त्यांमध्ये रोष दिसून येत होता. त्यानंतर आज त्यांनी या टीकेवर स्पष्टीकरण दिलं आहे.
‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. माझं संपुर्ण भाषण ऐकलं तर मी पवार साहेबांबद्दल असं काही बोललो नाही. पवार साहेबांनी ४० ते ५० वर्ष आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी काम केलं आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातील अनेक प्रादेशिक पक्ष आपल्या हिमतीवर बहूमत मिळवून सत्तेवर बसतात. परंतु महाराष्ट्रातील जनतेने अशी शक्ति पवार साहेबांच्या सोबत उभी केली नाही, याची मला खंत आहे, आणि ती खंत मी व्यक्त करत होतो, असं वळसे पाटील म्हणाले आहेत.
तर ते पुढे म्हणाले की, ‘पवार साहेबांना कमी लेखण्याचा किंवा पवार साहेबांना चुकीचं काही बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही’, असंही ते म्हणालेत.