‘या’ गावातील लोक बोलतात संस्कृतमध्ये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑगस्ट । ‘जगातील आद्य व्याकरणशुद्ध भाषा’ अशी संस्कृत भाषेची ख्याती आहे. अनेक भाषांची जननी असलेल्या संस्कृतमध्ये प्रचंड मोठे ज्ञानभांडार आहे. एके काळी आपल्या देशात संस्कृत ही बोलीभाषाही होती. कालांतराने प्राकृत भाषांमध्ये दैनंदिन व्यवहार अधिक होऊ लागले आणि संस्कृत केवळ ग्रंथांची आणि मंत्रांची भाषा बनून राहिली. मात्र, आजही आपल्या देशात काही गावं अशी आहे जिथे संस्कृतमधूनच संभाषणही होत असते. कर्नाटकातील मत्तूर हे गाव अशाच संस्कृत संवादासाठी प्रसिद्ध आहे.

मत्तूर नावाचे हे गाव तुंग नदीच्या काठावर वसलेले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. या गावाच्या आसपासच्या गावांमध्ये कन्नड भाषाच बोलली जाते, पण या गावातील आबालवृद्ध एकमेकांशी संस्कृतमधूनच संवाद साधतात. ही परंपरा 44 वर्षांपासून चालत आली आहे. 1981 मध्ये संस्कृतच्या प्रसारासाठी स्थापन केलेल्या ‘संस्कृत भारती’ या संस्थेने मत्तूरमध्ये दहा दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी उडुपीच्या पेजावर मठाच्या महंतांसह अन्य अनेक नामवंत व्यक्तींची उपस्थिती होती.

संस्कृतबाबत गावातील लोकांचा उत्साह पाहून त्यांनी ग्रामस्थांना संस्कृत शिकून तिचा रोजच्या व्यवहारात उपयोग करण्यास प्रोत्साहन दिले. या गावात प्राचीन काळीही संस्कृत बोलली जात असल्याचे सांगितले जाते. मध्य प्रदेशातही असेच एक गाव आहे जिथे सर्व लोक संस्कृत बोलतात. राजगढजवळील झिरी नावाच्या या गावातील सर्व लोक संस्कृतमध्येच एकमेकांशी दैनंदिन संवाद साधतात. आसाममध्येही असेच संस्कृत बोलणार्‍या लोकांचे गाव आहे. करीमगंज जिल्ह्यातील या गावाचे नाव आहे पटियाला. तिथे क्रिकेट सामन्याची कॉमेंट्रीही संस्कृतमधून होते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *