महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २० मे ।। पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. शहरातील रस्ते वाहतुकीत पुन्हा एकदा मोठे बदल करण्यात आले आहे. सध्या शिवाजीनगर परिसरातील सिमला ऑफीस चौकात मेट्रोच्या गर्डरचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन शिवाजीनगर वाहतूक शाखेने केलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सिमला ऑफीस चौकाकडे येणाऱ्या वाहनांना सूर्यमुखी दत्तमंदिर चौकाच्या (सेंट्रल मॉल चौक) पुढे कृषी महाविद्यालय (म्हसोबा गेट) समोरील पुलाच्या डाव्या बाजूने वीर चाफेकर चौकात (कृषी महाविद्यालय चौक) यावे.
तेथून डावीकडे न.ता. वाडी चौकातून (साखर संकुलसमोरील चौक) सरळ पुढे भुयारी मार्गातून इच्छित स्थळी जाता येणार आहे. तसेच सिमला ऑफीस चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी न.ता. वाडी चौकातून उजवीकडे वळून सिमला ऑफीस चौकाकडे जाता येईल.
फर्ग्युसन रस्त्यावरून सिमला ऑफीस चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी वीर चाफेकर चौकातून उजवीकडे न वळता सरळ साखर संकुल रस्त्याने न.ता. वाडी चौकातून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
स.गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे चौक) येथून सिमला ऑफीस चौकमार्गे औंध, बाणेर, पाषाणकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी हॉटेल प्राइडसमोरील पुलावरून जावे. तर शिवाजीनगर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुलाच्या उजव्या बाजूने वीर चाफेकर चौकातून उजवीकडे वळून न.ता. वाडी चौकातून जावे, असंही सांगण्यात आलं आहे.
वाकडेवाडी येथील भुयारी मार्गातून न. ता. वाडी चौकाकडे येणाऱ्या केवळ दुचाकींना प्रवेश असेल. मात्र, या भुयारी मार्गातून तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रवेश बंद राहील, वाहनचालकांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन वाहतूक शाखेने केलं आहे.