महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २० मे ।। दुष्काळ तसेच पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. यंदा लवकरच पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण, मान्सून रविवारी (१९ मे) रोजी अंदमानात दाखल झाला आहे. आता ३१ मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे हवामान खात्याने आज सोमवार आणि उद्या मंगळवारी देशातील अनेक राज्यांमध्ये तुफान पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लगबगीने शेतीच्या कामाला लागावे लागणार आहे.
सध्या अंदमानमध्ये पाऊस सुरु झाला आहे. त्याचबरोबर केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, हरियाणा, दिल्ली, पंजाब, राजस्थान उत्तर प्रदेश, या राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञ के एस होसळीकर यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार, असंही त्यांनी सांगितलं आहे. विशेष बाब म्हणजे, दरवर्षी मान्सून २२ मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होतो. यंदा ३ दिवस आधीच आला आहे.
महाराष्ट्रात कुठे कुठे कोसळणार पाऊस?
आयएमडीने नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवली आहे. यापार्श्वभूमीवर पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा-विदर्भात पाऊस कोसळणार
याशिवाय जळगाव, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांना देखील पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.