महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० मे ।। वाहन कोणतेही असो, ते चालवण्यासाठी रीतसर परवाना अर्थात लायसन्स घ्यावे लागते. या लायसन्ससाठी लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक चाचणीही द्यावी लागते. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतरच लायसन्स दिले जाते. आता दुचाकीसाठी तसेच चारचाकी वाहनांसाठी प्रशिक्षण संस्था असतात. त्या प्रशिक्षण देतात आणि परवाना मिळवून देण्यासाठीही मार्गदर्शन करतात. पण, रेल्वे चालकांसाठी लायसन्स असते का? असल्यास त्याची चाचणी कुठे होते? लायसन्स कसे दिले जाते? असा विचार मनात येऊन गेला तर त्याचे उत्तरही तितकेच औत्सुक्याचे आहे.
रेल्वे चालकाला लोको पायलट या नावाने ओळखले जाते. या पदासाठी रेल्वे दरवर्षी भरती करते. या पदासाठी निवड प्रक्रिया परीक्षा, मुलाखत आणि वैद्यकीय चाचणीनंतर पूर्ण केली जाते. निवड झालेल्या उमेदवाराला लोको पायलट प्रशिक्षण दिले जाते. त्यात रेल्वेशी संबंधित बारकावे सांगितले जातात. त्यांना प्रत्यक्ष सराव दिला जातो.
यानंतर त्यांच्या बोर्डाकडून भारतीय टेस्ट घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होणार्यांना प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर ट्रेन चालवण्यास परवानगी दिली जाते. हे प्रमाणपत्र लोको पायलटसाठी परवाना म्हणून काम करते. त्यानंतर ते ट्रेन चालवू शकतात. प्रथम लोको पायलट माल गाड्यांमध्ये तैनात केले जातात, नंतर त्यांना प्रवासी, नंतर एक्स्प्रेस आणि नंतर सुपरफास्ट गाड्या चालवण्याची परवानगी दिली जाते. अशी यामागील प्रक्रिया आहे.