महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ मे ।। खडकवासला – सिंहगड घाटात सततच्या पावसामुळे दरड कोसळत असते. त्यामुळे या दरडीसंदर्भात प्रभावी उपाययोजना करण्यासाठी मंगळवारपासून (ता. २१) गुरुवारपर्यंत (ता. २३) सिंहगड घाट रस्ता वाहतुकीला बंद ठेवला जाणार असल्याचा निर्णय भांबुर्डा वन विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.
सिंहगड घाटात आत्तापर्यंत अनेकदा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सिंहगडावर दरवर्षी लाखो पर्यटकांची गर्दी असते. परंतु घाट रस्त्यात आणि गडाच्या वाहन तळापासून खाली येणाऱ्या भागात दरवर्षी दरड कोसळते. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या दरड कोसळण्याच्या समस्येवर आयआयटी मुंबई, सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाच्या माध्यमातून उपाययोजनांवर सध्या काम सुरू आहे.
दरवर्षी मार्च व एप्रिल महिन्यात परीक्षा व उन्हाचा पारा जास्त असल्याने गडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी असते. त्या काळात घाट दुरुस्तीचे काम करणे योग्य होते. मात्र मे महिन्यापासून मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्यामुळे गडावर पर्यटकांची संख्या वाढत आहे. असे असतानाच घाट रस्ता बंद ठेवला जात असल्याने हॉटेलचालक, वाहनचालक व पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नकुल रणसिंग यांनी सांगितले, पहिल्या टप्प्यात ठिसूळ डोंगराचे काम हाती घेतले आहे. रस्त्यालगतचा १०० मीटरचा हा परिसर आहे. या डोंगराची उंची २५ ते ३० मीटर आहे. या ठिकाणी दोन नैसर्गिक टप्पे म्हणजे बेंचिंग केले जाणार आहे. यामुळे डोंगराचा मातीचा भाग मजबूत होण्यास मदत होईल.
उपाययोजनांबाबत
घाट रस्त्याच्या सुरुवातीला जगताप माचीच्या अलीकडे डोंगराचा ठिसूळ मातीचा भाग आहे. या ठिकाणी पाऊस वाऱ्यामुळे ठिसूळ माती सतत पडत असते. त्यामुळे येथे जाळ्या बसविता येत नाहीत. म्हणून येथे उतार स्थिर (स्लोप स्टेबल) करणार आहे. या डोंगरावर टप्पे केल्याने त्याचे स्थैर्य वाढणार आहे.
कठीण खडक असलेल्या ठिकाणी खडकात बोल्टिंग करून जाळ्या बसविल्या जातात. यंदा नवीन बोल्टिंग करून जाळ्या बसविण्याचा टप्पा पावसाळ्यानंतर हाती घेतला जाणार आहे.
जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून या कामासाठी एक कोटी रुपये वन विभागाकडे आले होते. हा निधी मागील वर्षी मार्च महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला. घाटाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सलग तीन दिवस वाहतूक बंद ठेवून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
– दीपक संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी भांबुर्डा