महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२८ मे ।। पुणे – नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात (जून ते सप्टेंबर) देशात यंदा सर्वसाधारण म्हणजेच १०६ टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आज जाहीर केला. देशात जून महिन्यात सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे, तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या नव्या अंदाजामुळे कृषी क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अंदाजात चार टक्क्यांची कमी-अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे. पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असलेल्या भागात (मॉन्सून कोअर झोन) यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मॉन्सून पावसाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज आज जाहीर केला.
हवामान विभागाने १५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजातही देशभरात १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. १९७१ ते २०२० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८७ सेंटिमीटर म्हणजेच ८६८.६ मिलिमीटर आहे, तर सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.
सुधारित अंदाजानुसार मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (३२ टक्के), तर दुष्काळाची शक्यता अवघी २ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. यंदा मॉन्सून हंगामात देशात पावसाचे वितरण चांगले राहण्याची शक्यता आहे. प्रमुख विभागनिहाय पावसाचे वितरण लक्षात घेता ईशान्य भारतात यंदा कमी पावसाची शक्यता अधिक आहे. पूर्वोत्तर राज्यांसह वायव्य भारताचा उत्तरेकडील भाग, पूर्व भारताच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे.
मॉन्सूनच्या मध्यावर ला-निना स्थिती शक्य
विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’ स्थिती वेगाने निवळत आहे. समुद्र पृष्ठभागाचे तापमान सर्वसाधारण स्थितीवर येत आहे. जागतिक हवामान प्रारूपानुसार (मॉडेल) मॉन्सून हंगामाच्या सुरुवातीला एल-निनो स्थिती सामान्य होणार असून, जुलै महिन्याच्या अखेरीस ‘ला- निना’ स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. ला-निना स्थिती मॉन्सूनच्या पावसाला पोषक समजली जाते.
हवामान विभागनिहाय पावसाचा अंदाज –
विभाग—अंदाज
वायव्य भारत—९२-१०८ टक्के
मध्य भारत—१०६ टक्के पेक्षा अधिक
दक्षिण भारत—१०६ टक्के पेक्षा अधिक
ईशान्य भारत—९४ टक्के
जून महिन्यात सर्वसाधारण पाऊस
जून महिन्यात देशात यंदा सर्वसाधारण पावसाचा (९२-१०८ टक्के) अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिण द्वीपकल्प, मध्य भारतासह वायव्य आणि ईशान्य भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर देशाच्या बहुतांशी भागात सरासरी पावसाचा अंदाज आहे.
जून महिन्यात मॉन्सूनच्या आगमनाचा कालावधी असल्याने हवामानात वेगाने बदल होत असतात. त्याचा पावसाच्या वितरणावर परिणाम होतो. यातच जून महिन्यात दक्षिण भारत वगळता देशाच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
राज्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक
मॉन्सूनच्या काळात महाराष्ट्रात यंदा दमदार पावसाचे संकेत आहेत. महाराष्ट्रासह मॉन्सून कोअर झोनमध्ये सरासरीपेक्षा जास्त (१०६ टक्क्यांपेक्षा अधिक) पाऊस पडण्याची शक्यता आहे. हंगामात महाराष्ट्रात पावसाचे वितरण सर्वदूर चांगले राहणार असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे.
यातच मराठवाडा आणि लगतच्या भागात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. जून महिन्यातही उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग वगळता बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मॉन्सून चार दिवसांत केरळमध्ये
नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी (ता. २६) बंगालच्या उपसागरातून प्रवास सुरू ठेवला. संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह व्यापल्यानंतर नैॡत्य, मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात प्रगती केली आहे. आता अरबी समुद्रातून मॉन्सूनच्या प्रगतीला सुरुवात होण्याची चिन्हे आहे. पुढील चार दिवसांत मॉन्सून केरळसह अरबी समुद्राच्या आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे.