महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२८ मे ।। For Hair Fall: केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. पण अनेक लोकांचे केस खुप कमकुवत असतात. त्याचबरोबर वयानुसार केस पांढरे देखील होऊ लागतात. याचे कारण म्हणजे बिघडलेली जीवनशैली आहारातील पोषणाचा अभाव आहे. महिला आणि पुरुष दोघांनाही काळे आणि घनदाट केस हवे असतात पण केस गळण्याच्या समस्यांमुळे ते त्रस्त असतात.
केस गळतीची समस्या कमी करण्यासाठी विविध महागडे प्रोडक्ट वापरतात. पण केस पांढरे होणे किंवा केस गळणे कमी करण्यासाठी रासायनिक उत्पादने हा कायमस्वरूपी उपाय नाही. यांचा अतिवापर केल्यानेही केस जास्त खराब होऊ शकतात. चांगली जीवनशैली आणि आहारासोबतच योगासन केल्याने देखील केसांचे आरोग्य चांगले राहू शकते.
त्रिकोणासन
केस अकाली पांढरे होत असतील, केसांमध्ये कोरडेपणा येत असेल आणि केस जास्त गळल्यामुळे पातळ दिसत असतील तर त्रिकोणासन करू शकता. हे आसन करण्यासाठी दोन्ही पाय काही अंतरावर ठेवून उभे रहावे. आता तुमचे हात आणि खांदे सरळ ठेवून वरच्या दिशेने करा. उजव्या बाजूला वाकून उजव्या हाताने पायाला स्पर्श करावे. डावा हात आकाशाकडे वर करा. दुसऱ्या बाजूने ही प्रक्रिया पुन्हा करू शकता.
शीर्षासन
शीर्षासन केल्याने डोक्याकडे होणारा रक्तप्रवाह सुधारतो. केसांची वाढ चांगली होते. ज्यांचे केस गळतात, निर्जीव असतात किंवा केस पांढरे होतात त्यांनी शिर्षासन करावे. तणाव कमी करण्यासाठी शिर्षासनाचा सराव करावा. हे आसन करण्यासाठी दोन्ही हात डोक्याच्या मागे घेऊन खाली वाकून डोके खाली ठेवा. शरीराचा समतोल राखताना पाय वरच्या बाजूला हलवा. डोक्यावर उभे असताना संतुलन राखा आणि सरळ व्हा.
उत्तानासन
उत्तानासनाचा नियमित सराव केल्यास केसांच्या समस्या कमी होतात. हा योग करण्यासाठी सरळ उभे राहावे. आता दीर्घ श्वास घ्यावा आणि दोन्ही हात वरच्या दिशेने करा आणि श्वास सोडा. नंतर हात जमिनीच्या दिशेने खाली करा आणि पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
बालासन
बलासनाच्या सरावाने पोटाशी संबंधित समस्या आणि तणावापासून आराम मिळू शकतो. पोटाच्या समस्या आणि तणावामुळे केस गळतात. त्यामुळे केसांची वाढ आणि घट्ट होण्यासाठी बालासन फायदेशीर ठरू शकते. हे आसन करण्यासाठी गुडघे वाकवून वज्रासनात बसावे. आता आपले हात वरच्या दिशेने हलवत दीर्घ श्वास घ्या. नंतर श्वास सोडताना शरीराला पुढे वाकवा. या स्थितीत डोके जमिनीवर आणि पोट मांड्यांवर ठेवावे.
( टीप – सामान्य माहितीवर आधारित लेख कोणतेही आसन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )