महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२९ मे ।। मौसमी वाऱ्याची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अंदमान-निकोबारमध्ये दाखल झालेला मान्सून आता हळूहळू पुढे सरकरत आहे. लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या ४८ तासांत मान्सून केरळात धडकण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बळीराजांनी शेतीच्या मशागतीला वेग द्यावा, पेरणीपूर्वीची कामे आटोपून घ्यावी, असंही सांगण्यात आलं आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. त्यामुळे अनेक शहरांना पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे.
त्यातच उन्हाचा पारा वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. ज्यामुळे शहरासह ग्रामीण भागाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशातच यंदा मान्सून लवकरच केरळात दाखल झाल्याने महाराष्ट्रातही अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडेल, अशी अनेकांना आशा आहे.
आज या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
मुंबईसह उपनगर, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बुधवारी आणि गुरुवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी मान्सून केरळात दाखल होईल. त्यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत ११ ते १२ जूनच्या सुमारास मान्सून दाखल होऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.