मावळ : हे दोन मतदारसंघ विजय आणि पराभव ठरविणारे ? कोण गुलाल उधळणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२९ मे ।। पुणे व रायगड जिल्ह्यात विभागलेल्या आणि दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.८७ टक्के मतदान झाले आहे. चिंचवड विधानसभेमध्ये सर्वाधिक तीन लाख २२ हजार ७००, तर पनवेलमध्ये दोन लाख ९५ हजार ९७३ मतदान झाले आहे. त्यामुळे मावळच्या निकालात चिंचवड, पनवेलचा कल निर्णायक राहण्याची शक्यता आहे.

मावळमध्ये गेल्या वेळी ५९.५७ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा ४.७३ टक्क्यांनी मतदान घटले आहे. घटलेल्या मताचा कोणाला फटका बसणार, याचे आखाडे बांधले जात आहेत. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी मुख्य लढत ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होती.

मावळमधील पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघांचा विचार केला असता चिंचवड व पनवेल हे दोन मतदारसंघ विजय आणि पराभव ठरविणारे आहेत. राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवड आणि त्याखालोखाल मतदार असलेल्या पनवेल या दोन्ही मतदारसंघांत सहा लाख १८ हजार ६७३ मतदान झाले आहे. हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ले आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार बारणे यांची भिस्त या दोन्ही मतदारसंघांवरील मतांवरच आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे यांना उरण, कर्जत आणि बालेकिल्ला असलेल्या पिंपरीतून आघाडीची अपेक्षा आहे. स्वत: उमेदवारासाठी राष्ट्रवादीतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आलेल्या वाघेरे यांनी ‘गद्दार विरुद्ध निष्ठावान’ हा मुद्दा प्रचारात आणला. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा प्रभाव दिसून आला नाही. पिंपरी, चिंचवड आणि मावळमध्ये नात्यागोत्यांच्या मतदारांचा कस असून गाववाले कोणाच्या पारड्यात भरभरून मते टाकतात, यावरही विजयाचे गणित अवलंबून असेल. मावळमध्ये शिवसेनेपेक्षा महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यामुळे महायुतीच्या बारणे यांची या दोन्ही पक्षांवर भिस्त दिसून आली. मतमोजणीपूर्वीच बारणे यांनी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, ताकदीने काम केले नसल्याचा आरोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *