महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२९ मे ।। Delhi Temperature : दिल्लीमध्ये आजवरच्या तापमानाचे सगळे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. बुधवारी पहिल्यांदाच उन्हाचा पारा ५२ डिग्री सेल्सियसच्याही वर पोहोचला. हवामान खात्याने याबाबत माहिती दिली आहे.
बुधवारी दुपारी अडीच वाजता दिल्लीतल्या मुंगेशपूरमध्ये ५२ डिग्रीपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहे. तब्बल ५२.३ डिग्री तापमानाची नोंद झाली असून उन्हामुळे नागरिक होरपळून निघाले आहेत. जेव्हा मंगेशपूरमध्ये एवढ्या तापमानाची नोंद झाली तेव्हा सरासरी तापमान ४५.८ डिग्री इतकं होतं.
पुढचे दोन दिवस कसं असेल तापमान?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेच्या लाटेपासून तीव्र उष्णतेच्या लाटेपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. ३० मे नंतर मात्र हळूहळू तापमानाचा पारा खाली येईल. ३१ मे रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगढ-दिल्लीतल्या काही भागांमध्ये उष्णतेची लाटू उफाळून येऊ शकते.
पश्चिमी उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचा अंदाज आहे. तसेच पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या वेगवेगळ्या भागात १ जून २०२४ रोजी उष्णता वाढू शकते. याशिवाय उष्णतेच्या प्रमाणात कमतरताही दिसू शकते.
दिल्लीत दुपारच्या वेळेला रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी कडक उन्हात न जाण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. शरीर थंड ठेवण्यासाठी सतत पाणी आणि लिंबू सरबत पिण्यास सांगितले जात आहे. उकाड्याचा फटका बसलेल्या लोकांची रुग्णालयातील वाढत असून ताप आणि खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत.