महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२९ मे ।। कल्याणीनगरचे अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच आता नागपुरात देखील हिट अँड रन प्रकरण घडल्याचे समोर आले आहे. नागपुरच्या शारदा चौकजवळ दोन महिला सकाळी चालत जात होत्या. त्याचवेळी मागून एक पांढऱ्या रंगाची कार आली आणि दोघींना जोरदार धडक दिली. यावेळी त्यातील एका महिलेला कारची जोरदार धडक बसली. त्यातील एक महिला लांब फेकली गेली. त्यानंतर त्याच कारने पुन्हा त्या महिलेला चिरडलं.ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
ही घटना ७ मे रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी शोध घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना यासंदर्भात विचारले असता चौकशी सुरू आहे. कारचालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात असल्याचं अपघातातील महिलांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी अपघातग्रस्त कुटुंबियांना त्या गाडीचा नंबर दिसत नाही तुम्ही आम्हाला गाडीचा नंबर द्या आम्ही पाहतो. तुम्ही नंबर द्या आम्ही कारवाई करतो असं पोलिसांनी म्हटल्याचं अपघातात जखमी झालेल्या कुटुंबियांनी सांगितलं आहे. या अपघाताला ३ आठवडे झाले आहेत. अद्याप या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
पुण्यातील कल्याणीनगर भागात अपघात
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील कल्याणीनगरमध्ये १९ मे शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगात पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या अनिस दुधिया आणि अश्विनी कोस्टा याचा मृत्यू झाला. हे प्रकरण सध्या प्रचंड चर्चेत आहे.