वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात पिंपरी-चिंचवडकर अव्वल …

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ सप्टेंबर । शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये गेल्या काही वर्षांत वाहतूक नियंत्रक दिवे लावण्यात आले असून, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत १ लाख ७८ हजार ५६२ वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांच्याकडून वाहतूक विभागाने तब्बल ६ कोटी ७ लाख ७७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना १५ ऑगस्ट २०१८ रोजी झाली. आयुक्तालय स्थापन होऊन पाच वर्षांचा कालावधी उलटला आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक विभागाच्या चौक्या आणि मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे. याशिवाय शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे कारवाईचा वेग वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

शहरातील विविध मार्गांवर बीआरटी थांबे रस्त्याच्या उजव्या बाजूला उभारले आहेत. थांब्यावर उतरलेल्या प्रवाशांना बीआरटी मार्ग ओलांडता यावा, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या यंत्रणेचा वापर होत नसल्याचे दिसून येते. शहरातील विविध चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, पोलीस हे वाहतुकीचे नियमन करण्याऐवजी कारवाईकडे लक्ष असल्याचेही चित्र आहे.

वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वेळोवेळी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही कडक कारवाई केली जाणार आहे. नियमांचे पालन न केल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चालकांनी नियमांचे पालन करावे. – विठ्ठल कुबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *