Delhi Temperature: दिल्लीतील तापमान 52 अंशांपर्यंत पोहोचलंच नव्हतं; मग घडलं तरी काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० मे ।। Delhi Temperature: देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या केरळ (Monsoon in kerala) राज्याला मान्सूनची प्रतीक्षा असतानाच भारतातील मध्य आणि उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांची मात्र होरपळ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. तिथं राजस्थानात (Rajasthan) तापमान 50 अंशांपर्यंच पोहोचलेलं असतानाच अचानकच दिल्लीमधूनही उष्णतेच्या लाटेनं सर्व विक्रम मोडल्याचं वृत्त समोर आलं. 29 मे 2024 अर्थात बुधवारी दिल्लीमध्ये तापमानानं सर्व विक्रम मोडित काढले.

हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्लीतील मुंगेशपुर भागामध्ये सर्वाधिक 52.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. दिल्लीमधील हे आतापर्यंत सर्वाधिक तापमान असल्याचं सांगण्यात आलं. ज्यामुळं संपूर्ण देशभरात चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं. चिंतेपेक्षा तापमानवाढीमुळं अनेकांनाच धडकी भरली आणि यंत्रणांनाही धक्काच बसला. इथं संपूर्ण देशभरात तापमानावाढीमुळं मोठ्या समस्येनं डोकं वर काढलेलं असतानाच हवामानशास्त्र विभागाच्या सेंसरमध्ये असणाऱ्या काही त्रुटींमुळं तापमानाच्या वाढीव आकड्याची नोंद करण्यात आली.

हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्लीत अद्याप 52.9 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली नसून, प्रत्यक्षात मात्र तापमानाचा आकडा 46.8 ते 48 अंश सेल्सिअसच्या दरम्यानच असल्याचं सांगण्यात आलं. काही ठिकाणी तापमानाच्या आकड्यानं पन्नाशीही गाठली. पण, त्यापलिकडे हा आकडा गेलाच नसल्याचं सांगत 52.9 अंश सेल्सिअस हा आकडा तांत्रिक त्रुटींमुळं दाखवण्यात आल्याची बाब अधोरेखित करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *