महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ मे ।। मावळ तालुक्यातील शेती ही धरणातील पाण्यावर अवलंबून आहे. औद्योगिक नगरी असलेली पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 30 दिवस पुरेल इतकाच म्हणजेच 23.90 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील इतर धरणातील पाणीसाठा शून्य टक्क्यांवर आला आहे. यामुळे शेतक-यांसह पिंपरी चिंचवडकरांना पावसाच्या प्रतिक्षेत आहेत अन्यथा जलसंकटाचा सामना करावा लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मावळ तालुक्यात पावसाळ्यात जोरदार पाऊस पडतो. हा पाऊस खरीप हंगामातील भात शेतीसाठी पूरक असा आहे. त्यानंतर रब्बीच्या पिकासाठी शेतकऱ्यांना धरणातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. तसेच अनेक शेतकऱ्यांनी ऊस लावला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते.
दरवर्षी परतीचा पाऊस चांगला होत असल्याने ऑक्टोबर महिन्यात धरणे शंभर टक्के भरली असतात. त्यामुळे सर्व धरणातील पाणीसाठा शेतकऱ्यांना वर्षभर पुरतो. मात्र गेल्यावर्षी अपेक्षित परतीचा पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणातील पाण्याचा ऑगस्ट महिन्यात वापर होऊ लागला.
यंदा उन्हाळा देखील तीव्र असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिली तर मावळातील शेतकरी वर्गाला आणि पिंपरी-चिंचवड शहराला हाेणा-या पाणी पूरवठ्यात कपात करावी लागणार असे चित्र सध्या आहे.