महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुन ।। कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीची आई शिवाणी अग्रवाल हिला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा शिवानी अग्रवालवर आरोप आहे. आज तिची चौकशी केली जाणार आहेत. त्यामुळे याप्रकरणी काही नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पुण्यातील कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने सुसाट पोर्शे कार चालवत दुचाकीला जोरदार धडक होती. या घटनेत दोघांचा (मुलगा आणि मुलगी) जागीच मृत्यू झाला होता. अपघातावेळी अल्पवयीन आरोपी हा दारू पिऊन कार चालवत असल्याचा आरोप झाला. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले.
मात्र, ससूनच्या दोन डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने डस्टबिनमध्ये टाकले. त्याच्या जागी त्यांनी त्याची आई शिवानी अग्रवाल हिचे रक्ताचे नमुने घेतले होते. या प्रकरणात डॉक्टरांनी तब्बल ३ लाख रुपयांची लाच घेतली होती, अशी धक्कादायक गोष्ट समोर आली. यानंतर पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना अटक केली.
आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात शिवानी अग्रवाल हिच्यावरही कायदेशीर कारवाई केली आहे. शिवानी अग्रवालला अटक करण्यात आली असून तिची कसून चौकशी केली जाणार आहे. दुपारनंतर अग्रवालला कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
याआधी पोलिसांनी अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील विशाल अग्रवाल, तसेच आजोबाला अटक केली होती. आता शिवानी अग्रवाल हिला देखील अटक केल्यानंतर संपूर्ण अग्रवाल कुटुंबच पोलीस कोठडीत राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवानी अग्रवालच्या चौकशीत नेमक्या कोणकोणत्या नवीन गोष्टी समोर येणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.