महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जून ।। Cristiano Ronaldo Video: खेळ कोणताही असला तरी पराभव हा कोणत्याही खेळाडूसाठी कठीणच असतो, त्यातही अंतिम सामन्यात झालेला पराभव अधिक बोचतो. असेच काहीसे दृश्य सौदीच्या किंग्स कप 2024 च्या अंतिम सामन्यानंतर दिसले.
अंतिम सामन्यात अल हिलाल संघाविरुद्ध अखेरच्या क्षणी पत्करावा लागलेल्या पराभवानंतर अल-नासरचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डोला अश्रु अनावर झाले.
शुक्रवारी (31 मे) जेद्दा येथे झालेल्या अंतिम सामन्यात अल हिलाल आणि अल नासर हे दोन संघ आमने-सामने होते. या सामन्याच्या निर्धारित वेळेनंतर 1-1 अशी गोल बरोबरी झाली होती. त्यामुळे पेनल्टी शुटआऊट झाले, ज्यात अल हिलालने 5-4 अशा फरकाने विजय मिळवला.
त्यामुळे अल-नासरची विजेतेपद मिळवण्याची संधी हुकली. त्यामुळे या पराभवाने अत्यंत निराश झालेल्या रोनाल्डोला त्याचे अश्रु आवरता आले नाहीत. तो मैदानावरच निराश होऊन आडवा पडला. यावेळी त्याला त्याच्या संघातील सदस्यांनी सहानुभूती देत धीर दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
नेमारने डिवचलं?
ब्राझीलचा स्टार फुटबॉलर नेमार हा अल-हिलाल संघाचा भाग आहे. मात्र सध्या तो दुखापतीमुळे मैदानातून बाहेर आहे. पण असे असले तरी आपल्या संघाला अंतिम सामन्यात पाठिंबा देण्यासाठी तो स्टेडियममध्ये उपस्थित होता.
दरम्यान, या सामन्यात त्याच्या आजूबाजूचे लोक रोनाल्डोला डिवचण्याच्या हेतूने मेस्सी…मेस्सी अशा घोषणा देत असताना तोही त्याची मजा घेताना दिसल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
Neymar and his friends chanting "Messi, Messi" during the Saudi Arabia King's Cup final between Al-Hilal and Al-Nassr ????️????????????????????
— All About Argentina ???????????? (@AlbicelesteTalk) May 31, 2024
रोनाल्डोसाठी निराशा
दरम्यान, रोनाल्डोसाठी यंदाचा हंगाम वैयक्तिकरित्या चांगला राहिला असला, तरी त्याला संघाला विजेतेपद मिळवून देता आलेले नाही, त्याचमुळे त्याची निराशा स्पष्ट दिसत होती.
काही दिवसांपूर्वीच सौदी प्रो लीगमध्ये अल-नासरला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे, अल हिलालने पहिला क्रमांक पटकावला. तसेच एशियन चॅम्पियन्स लगीमध्येही उपांत्यपूर्व फेरीत अल-नासरचा पराभव झाला होता.
दरम्यान, असे असले तरी 2022 च्या अखेरीस अल नासरशी जोडला गेलेल्या रोनाल्डोने या हंगामात 35 गोल करत नवा विक्रम केला.
अंतिम सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर अल हिलालसाठी अलेक्झँडर मित्रोविचने 7 व्या मिनिटालाच गोल करत संघाचे खाते उघडले होते. मात्र नंतर अल हिलालकडून कोणालाही गोल करता आला नाही. तेच अल नासरकडूनही पहिल्या हाफमध्ये गोल करण्यात अपयश आले. दोन्ही संघांनी चांगला बचाव केला होता.
दुसऱ्या हाफमध्येही दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देत असताना अखेरच्या क्षणी 88 व्या मिनिटाला अयमन याह्याने अल-नासरसाठी गोल नोंदवत बरोबरी साधली. यानंतर भरपाई वेळेतही दोन्ही संघांना आणखी गोल करता न आल्याने 1-1 अशी बरोबरी झाली आणि पेनल्टी शुटआऊटमध्ये निकाल लावण्यात आला.