सलग २१ व्या दिवशी पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका ; मुंबईत पेट्रोल ८७ रूपयांवर , डिझेलचे दर ७८.७१

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकश भांगे – पुणे – जूनपूर्वीच्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली नव्हती. या काळातील लॉकडाउनच्या कालावधीत इंधनाचा वापरही मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. दरवाढ नसल्याने मे महिन्याच्या अखेरीस शहरामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर सुमारे ७६ रुपये, तर डिझेलचा प्रतिलिटर दर ६५ रुपयांच्या जवळपास होता. परंतु आता गेल्या २१ दिवसांपासून पेट्रोल दरवाढीचं सत्र मात्र कायम आहे. दरम्यान, आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात २५ पैशांची तर डिझेलच्या दरात २१ पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ८०.३८ रूपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ८०.४० रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत.

शनिवारी पेट्रोलियम कंपन्यांनी सलग एकविसाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. यानंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८७.१४ रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७८.७१ रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ८३.५९ रूपये प्रति लिटर आणि ७७.६१ रूपये, तर कोलकात्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन ते अनुक्रमे ८२.०५ रूपये प्रति लिटर आणि ७५.५२ रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर बंगळुरूमध्ये पेट्रोलचे दर ८२.९९ रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७६.४५ रूपये प्रति लिटरवर गेले आहेत.

 

सध्या आंतरराष्ट्रीय स्तरारवर कच्च्या तेलाची किंमत कमी असली तरी देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. सध्या इंडियन बास्केट कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होऊन ते ४२ डॉलर्स प्रति बॅरलच्या जवळपास आलं आहे. गेल्या २१ दिवसांमध्ये डिझेलच्या दरात ११ रूपयांची आणि पेट्रोलच्या दरात ९.१२ रूपयांची वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *