![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुन ।। मॉन्सूनची महाराष्ट्राच्या दिशेने घोडदौड कायम आहे. तो पुढील चार ते पाच दिवसांमध्ये तळकोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.अरबी समुद्रातून प्रवाहाचा वेग कायम असल्याने मॉन्सूनने वाटचाल सुरूच ठेवली आहे. मॉन्सूनने सोमवारी कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागांत प्रगती केली.
पुढील चार दिवसांपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तविली आहे. केरळमध्ये वेळेआधी (३० जून) दाखल झाल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल सुरूच आहे. रविवारी (ता. २) दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली. संपूर्ण केरळ, तमिळनाडू व्यापून वाऱ्यांनी दक्षिण कर्नाटकातील मंगळूर, चित्रदुर्ग ते आंध्र प्रदेशातील नेल्लूरपर्यंत मजल मारली होती.
बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सूनने प्रगती केली. मॉन्सूनच्या वाटचालीचा वेग सोमवारी (ता. ३) सुरूच होता. मोसमी वाऱ्यांनी कर्नाटकातील होन्नावर, बेल्लारी, आंध्र प्रदेशातील कर्नूल, तेलंगणमधील नरसापूरपर्यंत प्रगती केली. पुढील चार दिवसांत मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, रायलसिमा, तेलंगण, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा उर्वरित भाग, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशाचा काही भाग आणि बंगालच्या उपसागरात मॉन्सूनची प्रगती होण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
शुक्रवारपासून (ता. ७) कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली आहे. राज्यात गेल्या वर्षी पावसाने दडी मारली. त्यामुळे धरणात जेमतेम पाणीसाठा झाला, तो आता झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पाणी कपातीची टांगली तलवार शहरांवर आहे. ग्रामीण भागात पाण्याचे भीषण दुर्भिक्ष आहे. या पार्श्वभूमीवर मॉन्सूनची राज्याच्या दिशेने घोडदौड सुरू असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
