महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुन ।। सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना थेट सभेतून उमेदवारी जाहीर करणं हे उद्धव ठाकरेंना महागात पडलं आहे. कारण यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली होती. काँग्रेसची पारंपरिक जागा असलेला हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरेंनी घेतल्याने आघाडी फुटणार की काय? इथपर्यंत महाविकास आघाडीतला संघर्ष टोकाला गेला होता. अशात विशाल पाटील हेच निवडून येतील अशी स्थिती आता निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल
काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकला
काँग्रेसने विशाल पाटील यांना उमेदवारी नाकाराली. तर उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी थेट जाहीर करुन टाकली. महाविकास आघाडीतल्या दोन प्रमुख पक्षांना हे निर्णय पश्चात्ताप करायला लावणारे ठरले आहेत. लोकसभा निवडणुकीचे जे कल समोर येत आहेत त्यानुसार ३३ हजारांहून अधिक मताधिक्य सध्याच्या घडीला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याकडे आहे. यामुळे ते निर्णयाक आघाडी घेतील आणि निवडून येतील अशी स्थिती आहे. भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील या दोघांनाही ते आस्मान दाखवणार हे निश्चित मानलं जातं आहे.
सांगलीत ६१ टक्के मतदान
सांगलीत लोकसभा निवडणुकीत ६१ टक्के मतदान झालं. चंद्रहार पाटील यांना उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवारी जाहीर केली. ज्यामुळे महाविकास आघाडीतला काँग्रेस हा पक्ष प्रचंड नाराज झाला होता. उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी चंद्रहार पाटील यांना मदत न करता विशाल पाटील यांना मदत केल्याची चर्चा आहे. सांगलीच्या एक्झिट पोलमध्येही विशाल पाटील विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे संजयकाकांची धाकधूक वाढली आहे. सांगलीत बाजी कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण विशाल पाटील यांनी जी आघाडी घेतली आहे त्यावरुन सांगलीत विशाल पाटील यांचा विजय निश्चित मानला जातो आहे.
