Pune Loksabha Result : वसंत मोरे यांच्यासह ३३ जणांची अनामत जप्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुन ।। पुणे लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार वसंत मोरे, पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाचे माजी प्रमुख प्रशांत रणपिसे यांच्यासह ३३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. एकूण वैध मतांच्या एक षष्ठमांश मते न मिळाल्याने त्यांच्यावर ही नामुष्की ओढविली.

या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह ३५ उमेदवार रिंगणात होते. उमेदवारी अर्ज भरताना त्यासोबत २५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. एकूण वैध मतांच्या एक षष्ठमांश मते मिळाली नाही तर अनामत रक्कम जप्त होते. केंद्रीय निवडणूक आयोगाचा तसा नियम आहे.

या मतदारसंघातील १० लाख ९७ हजार ११२ मते वैध ठरली. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला किमान म्हणजे एक लाख ८४ हजार मते मिळणे अपेक्षित होते. मोहोळ आणि धंगेकर वगळता एकाही उमेदवाराला तेवढी मते मिळविता आली नाहीत. मोरे यांना ३२ हजार १२, तर रणपिसे यांना ३ हजार ९७४ मते मिळाली. अन्य उमेदवारांना जेमतेम एक हजारापर्यंत मते मिळाली. त्यामुळे नियमानुसार त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात येईल.

यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे म्हणाले,‘‘ आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना एकूण वैध मतांच्या एक षष्ठमांश मते मिळणे अपेक्षित आहे. अन्यथा त्यांची अनामत रक्कम जप्त होते. या नियमानुसार लवकरच कार्यवाही करण्यात येईल.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *