महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जुन ।। राज्यात शुक्रवारपासून (ता. ७) पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह धुवाधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी दिला. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा ‘येलो अलर्ट’ जाहीर केल्याची माहिती विभागाने दिली.
राज्याच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला आहे. कमी वेळेत ठरावीक भागात मोठा पाऊस पडल्याने पुण्यासह बहुतांश भागाला फटका बसला. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मॉन्सूनच्या सरींनी गारवा निर्माण झाला आहे; तर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाला असला; तरी उर्वरित महाराष्ट्रावर पूर्व मोसमी पावसाच्या ढगांची छाया कायम आहे.
उत्तर गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून मध्य प्रदेशापासून पश्चिम बंगालपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मॉन्सून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात दाखल झाला असतानाच, उर्वरित राज्यात पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला आहे.
राज्यात उकाडा कायम असून, दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
येथे होणार वादळी पाऊस
कोकण : मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.