Ganeshkhind Road Traffic : गणेशखिंड मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी ; नागरिकांची आणखी किती गैरसोय करणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जुन ।। पावसाची (Pune Rain) संततधार, खड्डे पडलेले रस्ते आणि त्यातच सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम अशा तिहेरी कारणांमुळे गणेशखिंड रस्त्यावर (Ganeshkhind Road) आज (शुक्रवार) सकाळपासून दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पावसामुळे नागरिकांनी चारचाकी वाहने काढल्याने वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली. दरम्यान, सकाळी कामावर जाण्याच्या वेळेस वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.

गणेशखिंड रस्त्यावर बहुमजली उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून औंध, बाणेरकडून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक व्हमनिकॉम, रेंज हिल्स व पुन्हा कृषी महाविद्यालय येथे वळविण्यात आली आहे. त्यामुळे आगोदरच वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. त्यातच शुक्रवारपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापठाजवळील आचार्य आनंद ऋषी महाराज चौकातील उड्डाणपुलाच्या रॅम्पसाठी आवश्यक पोर्टल बिमचे काम सुरू करण्यात आले.

त्यामुळे रस्ता अरुंद झाला. परिणामी, एकावेळी जास्त वाहने पुढे जाण्यावर मर्यादा आली. त्यातच आज सकाळपासून शहरात पाऊस सुरू झाला. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांवर खड्डे तयार होऊन, तसेच ड्रेनेजची झाकणे उघडल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना अक्षरशः कसरत करावी लागत होती. वाहतूक संथ झाली. मुख्य रस्त्यासह बदल करण्यात आलेल्या अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

पाऊस सुरू असल्याने अनेक नागरिकांनी दुचाकी ऐवजी चारचाकी वाहने रस्त्यावर आणली. त्यामुळे तर वाहतूक कोंडीत आणखीन भर पडली. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, अनेक ठिकाणी ड्रेनेजची झाकणे उघडल्याने वाहनचालकांसाठी ते धोकादायक झाले आहेत.

वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता, औंध रस्ता, बाणेर रस्ता, विद्यापीठातील अंतर्गत दोन रस्ते, येथून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक मंदावली. विद्यापीठातील रस्त्यात एक ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कामावर जाण्याच्या वेळेस वाहतूक कोंडी झाल्याने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *