Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील पुलाला मोठं भगदाड; लोखंडी राफ्टर तुटल्याने ३ दिवसांत ४ अपघात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुन ।। विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची एका वर्षातच दयनिय अवस्था झाल्याचं समोर आलं आहे. समृद्धी महामार्गावर बांधण्यात आलेल्या पुलावर मोठं भगदाड पडलं आहे. या भगदाडामुळे गेल्या ३ दिवसांत ४ वाहनांचे अपघात झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, याकडे प्रशासनाकडून याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे.

समृद्धी महामार्गावरील बुलढाणा येथील मुंबई कॉरिडॉरवरील चेनेज क्रमांक 309 वरील पुलावर हे भगदाड पडलं आहे. पुलाचा लोखंडी राफ्टर तुटल्याने मोठ्या अपघाताची घटना घडण्याची शक्यता आहे. आधीच समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत आहेत.

त्यातच अशा जीवघेण्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने आमचा जीव घेण्याचं ठरवलं आहे का? असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. धक्कादायक म्हणजे हे भगदाड बुजविण्यासाठी कापडी पोतडीचा वापर करण्यात आला आहे.

तसेच कापड आणि प्लास्टिक पिशव्या टाकून खड्डा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गुरुवारी (ता. १४) याच खड्ड्यात एका खासगी बसचे चाक अडकल्याने अपघात झाला होता. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले होते. चालकाने वेळीच ब्रेक दाबल्याने सुदैवाने बस पुलाखाली कोसळली नाही.

आज शुक्रवारी सकाळी याच खड्ड्यामुळे एका कारचा अपघात झाला. नागपूर येथून मुंबईच्या दिशेने ही कार निघाली होती. बुलढाण्याजवळील या भगदाड पडलेल्या पुलावर कार आली असता खड्ड्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच कार थेट रस्त्यावर आडवी झाली.

या घटनेत काहीजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावरून दररोज सुसाट वेगाने हजारो वाहने धावतात. या जीवघेण्या खड्ड्यामुळे दोन दिवसांतच ४ अपघात झाले आहेत. त्यामुळे आतातरी प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *