महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुन ।। लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर जिल्ह्यात दोघांनी आत्महत्या केल्या होत्या. यात तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट वायभासे यांच्या कुटुंबीयांचे पंकजा यांनी रविवारी भेट देऊन सांत्वन केले. यावेळी कुटुंबियांना धीर देताना पंकजा यांनाही अश्रू अनावर झाले. ‘आता आत्महत्या करू नका, मला लढण्यासाठी बळ द्या, आत्महत्या थांबल्या नाही तर मी राजकारण सोडून देईल’, असे उद्गार पंकजा यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना काढले.
त्या म्हणाल्या, आत्महत्यांसारख्या घटनांनी मी खूप अस्वस्थ होते. माझ्या प्रकृतीवर देखील याचा परिणाम झाला आहे. मी शब्दांत सांगू शकत नाही. पण मी कधीही कार्यकर्त्यांना यंत्रासारखं वापरलं नाही. मी त्यांना नेहमी माझ्या कुटुंबातील सदस्य मानलं. त्यांना मी जीव लावला. माझा पराभव झाला म्हणून हे लोक जीव देत आहेत, हे मला अजिबात मान्य नाही. मागील १० वर्षांपासून मी राजकारणात आहे, मी कधीही स्वत:चं संतुलन बिघडू दिलं नाही. मात्र या घटनांमुळे कमकुवत झाले आहे. मला खूप अपराधी वाटतंय. कारण माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी काहीच देऊ शकत नाही.