महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुन ।। पुणे : महाराष्ट्रात आल्यानंतर नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रगतीला ‘ब्रेक’ लागल्याची स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरला असून, गेल्या सहा दिवसांपासून त्याच्या वाटचालीत फारशी प्रगती झाली नाही, अशी माहिती हवामान खात्याने रविवारी दिली.
राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. विदर्भात कमाल तापमान पुन्हा चाळीशीपार गेले आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान विदर्भातील चंद्रपूर येथे ४१.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. बम्हपुरी आणि वर्धा येथे पारा ४० अंशांपार आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामान होत असतानाच, उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे.
विदर्भात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मॉन्सून दाखल झालेल्या भागांतही पावसाने उसंत घेतली आहे. मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मजल मारली आहे. बुधवारी (ता. १२) विदर्भात वाटचाल करताना अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत धाव घेतली आहे.
त्यानंतर मात्र मॉन्सूनची चाल मंदावली असून, रविवारी (ता. १६) मॉन्सूनची कोणतीही प्रगती झालेली नाही. खानदेश, पूर्व विदर्भात मॉन्सूनची प्रतीक्षा कायम आहे. मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी चार ते पाच दिवस वाट पाहावी लागणार आहे. राज्यात १ ते १६ जून दरम्यान ९३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या दरम्यान राज्यात सरासरी ८५.२ मिमी पाऊस पडतो.