30 जूननंतर हळूहळू अनलॉक :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई -अनलॉकच्या पहिल्या पर्वात ‘मिशन बिगिन अगेन’च्या माध्यमातून राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. राज्याच्या अर्थचक्राला चालना मिळाली. लॉकडाऊन 30 जूनला संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.

कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे 30 जूननंतर हळूहळू अनलॉक होईल, अनेक गोष्टी सुरू होतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. मात्र गरज नसताना बाहेर पडलात, गर्दी झाली आणि कोरोनाच्या केसेस वाढल्या तर तेथे कडक लॉकडाऊन करावा लागेल असा इशारही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ही परिस्थिती अशीच राहणारही नाही. लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवत आपण एक एक पाऊल टाकत पुढे जाणार आहोत. काही दुकाने, कार्यालये सुरू झाली. आजपासून आपण नाभिकांची सेवाही सुरू केली. हे हळू का करत आहोत, तर संकट अजूनही टळलेले नाही. सगळे सुरू केले म्हणजे परिस्थिती सुरळीत झाली असे समजू नका, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी बजावले.

1 जुलै रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ आहे. कोरोना युद्धात लढणाऱया सर्व डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. तसेच त्या दिवशी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन आहे. यंदा राज्य सरकारतर्फे हा सप्ताह ‘शेतकरी सप्ताह’ म्हणून साजरा केला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नव्या हंगामात बोगस बियाणे विकणाऱयांवर गंभीर गुन्हे दाखल करू आणि त्यांच्याकडून नुकसानभरपाईही वसूल करू, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

कोरोना संकटकाळात सण व उत्सवांबद्दल केलेल्या सहकार्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वधमीयांचे आभार मानले. दहीहंडीचा उत्सव रद्द करण्यात आला, रामनवमी, ईदसारखे सण घरच्या घरी साजरे झाले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही सरकारचे निर्देश मान्य केले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास

अर्थचक्राच्या बाबत महाराष्ट्र खचून गेलेला नाही. गेल्या काही दिवसांत 16 हजार कोटींची गुंतवणूक राज्यात झाली. गुंतवणूकदारांना महाराष्ट्र आपला वाटतो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात येणाऱया उद्योगांना आवश्यक त्या सुविधा दिल्या जात आहेत. पर्यटन, उद्योगांसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी देण्यात येत आहेत. या माध्यमातून भूमिपुत्रांना मोठय़ा प्रमाणात रोजगार मिळणार असून त्यादृष्टीने गुंतवणूकदारांना सोयी, सुविधा देण्यावर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

प्लाझ्मा दान करा!

कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी तयार झालेल्या असतात. त्यामुळे त्याचा प्लाझ्मा घेतल्याने दुसरा करोनाबाधित रुग्ण 90 टक्के बरा होऊ शकतो. त्यामुळे कोरोनातून मुक्त होऊन घरी गेलेल्या व्यक्तींनी सरकारी रुग्णालयांशी संपर्प साधून रक्तदानाप्रमाणे प्लाझ्मा दान करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
औषधे मोफत देणार

कोरोनावरील उपचारासाठी नवनवीन औषधे येत आहेत. कोणत्याही औषधांचा वापर करण्यात आपण पाठी नाही. डेक्सामेथाझोन हे औषध आपण गेल्या दोन आठवडय़ांपासून वापरत आहोत. मात्र जी औषधं वापरतो त्यास केंद्राची परवानगी घ्यावी लागते, रुग्णांची टेस्ट घ्यावी लागते. गेल्या आठवडय़ात रेमडेसिवीर हे औषध वापरण्यास परवानगी मिळाली. या औषधांच्या किंमतीची काळजी करू नका. सर्व शासकीय व अन्य अशासकीय रुग्णालयांत कोरोना उपचारासाठीची औषधे मोफत उपलब्ध करून दिली जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आषाढवारीला पंढरपूरला जाणार

यंदाच्या आषाढवारीला मी मुख्यमंत्री म्हणून नाही, तर राज्यातील विठ्ठलभक्तांचा प्रतिनिधी म्हणून जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. विठुरायाच्या दर्शनाला जाणार आणि त्याच्या चरणी कोरोनामुक्त राज्याचे साकडे घालणार. हे विठुराया, तुझा चमत्कार पुन्हा दाखव आणि कोरोनाचे संकट दूर कर, असे साकडे घालणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

डॉक्टरांनी उपचारासाठी पुढे यावे

अनलॉकमुळे कोरोना संसर्ग वाढलाय. त्यामुळे आपण टेस्टची संख्याही वाढवली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपण ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम मुंबईत राबवत आहोत. व्हायरस पोहोचण्याच्या आत आपलं आरोग्य पथक तिथे पोहोचतं. ही मोहीम संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे. मात्र हे करत असताना डॉक्टरांनीदेखील उपचाराच्या कामासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *