Weather Forecast : पुणे,मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्टराज्यात पुढील ३-४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जुन ।। मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध भागात सध्या जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. येत्या २४ तासांत मौसमी वारे संपूर्ण राज्याला व्यापतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहेत. त्यामुळे आजपासून पुढील ५ दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची (Heavy Rain शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे.

यंदा वेळेआधीच मान्सून राज्यात दाखल झाला होता. मात्र, त्यानंतर पावसाने राज्याकडे पाठ फिरवली होती. सलग १० दिवस पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा पावसाने पुनरागमन केलं आहे. आज शनिवारपासून पुढील ५ दिवस राज्यात जोरदार पाऊस (Rain Alert) होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

मुंबईत पहाटेपासून पावसाला सुरुवात
मुंबईसह उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. शनिवारी पहाटेपासून मुंबई, नवी मुंबई, पनवेल तसेच रायगडमध्ये पाऊस सुरू आहे. पावसामुळे सखल भागात पाणी शिरलं असून मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, पुढील ३-४ तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात कुठे कुठे कोसळणार पाऊस?
मुंबईसोबतच आज पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसतील.

नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुबार आणि जळगाव जिल्ह्यातही आजपासून जोरदार पावसाला सुरुवात होईल. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ५ दिवस राज्यात पावसाची अशीच स्थिती राहिल, असं भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *