महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जुन ।। लोकसभा निवडणुकीमध्ये दहापैकी आठ उमेदवार निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (दि.21) नवनिर्वाचित खासदार व प्रमुख आमदारांसह तब्बल चार तास बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भात खलबते केली.
मार्केट यार्डमधील निसर्ग मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, नीलेश लंके, बजरंग सोनवणे, अमर काळे, भास्कर भगरे, आमदार रोहित पवार आदींसह काही माजी आमदार उपस्थित होते. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा हे आरोग्याच्या कारणामुळे अनुपस्थित होते.
महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक असतानाही शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात जास्त काही न ताणता केवळ दहा जागा घेतल्या आणि झंझावाती प्रचार करत दहापैकी आठ जागा निवडून आणल्या. सातार्याची जागा कमी मताने पराभूत झाली. इतर पक्षांच्या तुलनेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा जास्त जागांचा आग्रह महाविकास आघाडीमध्ये राहणार आहे. या अनुषंगाने शरद पवार यांनी शुक्रवारी बैठक घेऊन तब्बल चार तास निवडणूक व इतर विषयांवर चर्चा केली.
महाविकास आघाडी टिकण्यासाठी कमी जागा घेतल्या
शरद पवार यांनी शुक्रवारी सकाळी त्यांच्या पुण्यातील मोदीबागेतील निवासस्थानी काही खासदार व निवडक नेत्यांशी अनौपचारिक चर्चा केली. या वेळी त्यांनी आपण महाविकास आघाडी टिकण्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये कमी म्हणजे दहा जागा घेतल्या. आपले लक्ष्य लोकसभा नाही, तर विधानसभा होते, त्यामुळे आपणास विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत, असे सूचित केले.