मुख्यमंत्र्यानी स्वत: गाडी चालवत केला मुंबई-पंढरपूर-मुंबई प्रवास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पंढरपूर – ता. २ : याआधी अनेकदा मंत्रालयात जाताना मुख्यमंत्र्यांनी गाडीचा ताबा स्वत:च्या हातात घेतलेला पाहिला आहे, आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा केली, यावेळी ते स्वत: गाडी चालवत पंढरपूर गेले, त्यांच्यासोबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते, मुंबई ते पंढरपूर असा प्रवास करुन मुख्यमंत्री मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास पंढरपूरात दाखल झाले.

मध्यरात्री अडीचच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पांडुरंगाची शासकीय महापूजा पार पाडली. या महापुजेनंतर त्यांनी वारकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, मंदिरात भाषण करायचं नसतं, आपण सगळेजण माऊलींचे भक्त म्हणून जमलो आहोत, ना कोणी मुख्यमंत्री ना अधिकारी माऊलींसमोर आपण सगळे सारखेच आहेत. हा मान मला मिळेल असा स्वप्नातही विचार केला नव्हता, मान मिळाला पण अशा परिस्थितीत पूजा करावी लागेल हेदेखील कधी विचार केला नव्हता असं ते म्हणाले.

तसेच मी इथं आलोय, केवळ महाराष्ट्राच्या वतीनं नाही तर संपूर्ण विश्वाच्यावतीनं आलो आहे. माऊलींच्या चरणी साकडं घालायला आलो आहे. साकडं घातलं आहे, मला विश्वास आहे, आजपर्यंत अनेकदा माऊलींचे चमत्कार ऐकत आलो आहेत. कित्येक वर्ष ही परंपरा अविरत सुरु आहे. आता मला या चमत्काराची परंपरा बघायची आहे. आम्हाला चमत्कार दाखव, मानवाने हात टेकले आहेत, आपल्याकडे काहीच औषध नाही, किती दिवस तोंडाला पट्टी बांधून जगायचं? संपूर्ण आयुष्य अखडून गेले आहेत. आषाढीच्या दिवसापासून कोरोनाचं संकट नष्ट होवो, संपूर्ण जगाला आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो हे साकडं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विठ्ठला चरणी घातलं.

या महापुजेनंतर सकाळच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने पुन्हा रवाना झाला. त्यावेळी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गाडी चालवत होते, त्यांच्यासोबत बाजूच्या सीटवर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या होत्या. पंढरपूरहून मुंबई अशा ७ तासांच्या प्रवासात मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चालवली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *